शिरूरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन : जुन्या शिव सैनिकांनी आठवणी केल्या उजागर

शिरूरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन : जुन्या शिव सैनिकांनी आठवणी केल्या उजागर
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २३ जानेवारी २०२४.

२३ जानेवारी म्हणजे जनतेने ज्यांना हिंदूहृदय सम्राट ही पदवी दिली, असे शिवसेनेचे थोर संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. या दिवशी सर्व शिवसैनिक बाळासाहेबांना नतमस्तक होऊन अभिवादन करत असतात.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीजवळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करत, पुष्पहार प्रदान करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केल्याची माहिती, माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख संजय देशमुख यांनी दिली.
या अभिवादन कार्यक्रमासाठी उप शहरप्रमुख महादेव कडाळे, शहर संघटक पप्पू गव्हाणे, माजी उप शहरप्रमुख सुनील परदेशी, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, उप शहरप्रमुख संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड रवींद्र खांडरे, ज्येष्ठ शिवसैनिक व निवृत्त शिक्षक बाळासाहेब गायकवाड सर व विलास आंबेकर सर आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


यावेळी शिरूर शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक तसेच तत्कालीन तालुका सरचिटणीस खुशालबापू गाडे व बाळासाहेब गायकवाड सर यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले की, ” ई. स. १९८४ साली आम्ही दोघे व शिरूर चे तत्कालीन काही जुने शिवसैनिक, त्यात माजी तालुका प्रमुख कै. चंद्रकांत पोटावळे, तत्कालीन उप तालुकाप्रमुख कै. शशिकांत गदादे, तत्कालीन तालुका संघटक प्रा. अनिल शिंदे, खंडाळेचे तत्कालीन शाखाप्रमुख शहाजी नळकांडे, तत्कालीन शिरूर शहरप्रमुख कै. अजित मल्लाव, शिरूरचे तत्कालीन उप शाखाप्रमुख भाऊ शेजवळ, बाळासाहेब झरेकर असे आम्ही अनेकजण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी, बांद्र्याच्या कलानगर येथील मातोश्री बंगल्यावर, शिरूरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी शिरूरचा त्यांचा असणारा अंगरक्षक प्रवीण तोटे, यांनी बाळासाहेबांना आधीच कल्पना दिली होती की, माझे गावकरी आपल्या भेटीसाठी आज येणार आहेत. त्यामुळे आमची व बाळासाहेबांची भेट तात्काळ झाली. बाळासाहेबांशी हितगुज करता करता चहापान झाला. बाळासाहेबांनी निमंत्रणाचा स्वीकार करत, पत्नी मीनाताई ठाकरे (मासाहेब) यांना हाक मारून बोलावले. त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख घेऊन आमच्या हातावर ठेवत व शिरूरच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करा असे सांगत, आता जेवणाची वेळ झालीय, तेव्हा जाताना एखाद्या हॉटेलमध्ये पोटभर जेवण करून जाण्याचेही अधिकार वाणीतून सांगितले. त्यामुळे बाळासाहेबांच्या या आपलेपणाच्या वागणुकीचे आम्हा सर्वांना खूप कौतुक वाटले. आम्ही त्यांच्या या अशा आठवणी कायम जपत आलेलो आहोत. आमच्यातील काही तत्कालीन मित्र आत्ता या जगात नाहीत, तसेच बाळासाहेबही नाहीत. परंतु आम्ही आता हयात असलेले सर्वजण आत्तापर्यंत एकनिष्ठेने शिवसेनेत आहोत, ते केवळ बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रेमामुळेच.” असे सांगत असतानाच त्यांनी तेव्हाच्या मुंबई प्रवासाचा किस्साही सांगितला. “आम्ही त्यावेळी एक जुनी कमांडर गाडी व एक मिनीडोअर चारचाकी गाडी, अजय मल्लाव या आमच्या फिटर मीत्राच्या गॅरेजमधुन घेऊन गेलो होतो. जुनी असल्याने लोणावळा खंडाळा घाटात ती मिनी डोअर गाडी बंद पडल्याने आमची खूप फजिती झाली होती.”
“आम्ही बाळासाहेबांना शिरूरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन परत शिरूरला आलो व झपाट्याने कार्यक्रमाच्या तयारी लागलो. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी शिरूरच्या ऐतिहासिक पाच कंदील चौकात बाळासाहेब सभेला येणार म्हणून प्रचंड गर्दी झाली होती. बाळासाहेब आले, सभेची जय्यत तयारी व प्रचंड गर्दी पाहून ते खूप खुश झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री शाबिरभाई शेख, सिने अभिनेते दादा कोंडके, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ नेते के टी थापा, नंदू घाटे, रमेश बोडखे आदी मोठे पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेबांनी आम्हाला त्यांच्या भाषणातच शाब्बासकीची थाप दिली, त्यामुळे आम्ही खूप खुश झालो व तेवढ्याच जोमाने कामाला लागलो. आम्ही आजही त्यांच्याशी एकनिष्ठ राहूनच शिवसेनेत काम करत आहोत.”
“शिरूरला झालेल्या या सभेच्या स्टेजवर, आत्ताचे महाराष्ट्राचे असणारे सुप्रसिद्ध गायक अजय व अतुल या दोघांनी विद्यार्थीदशेत बाळासाहेबांसमोर पोवाडा गायला होता. बाळासाहेबांना तो खूप आवडला. त्यांनी अजय व अतुल या दोघा भावंडांना मुंबईला येऊन भेटण्यास सांगितले. पुढे बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर सतत राहिला. अजय व अतुल गोगावले यांचे वडील त्या वेळी शिरूरला सरकारी नोकरीत बदली होऊन आलेले होते व एका भाड्याच्या खोलीत राहत होते. शिरूरकरांच्या अशा खूप जुन्या आठवणी आहेत, की ज्या थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जोडल्या असल्याच्या स्मृती, यावेळी जुन्या शिवसैनिकांनी आपला आवाज चे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांच्याशी बोलताना उजागर केल्या.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *