पिंपळे जगताप येथील १०६ वर्षाच्या आजींनी मतदान केंद्रावर जावून केले मतदान

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या कार्यतत्परतेमुळे गर्भवती महिलेने बजावला मतदानाचा हक्क

गर्भवती महिलेने रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क

 

जिल्ह्यात पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथीय, नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांची मतदानाप्रती असलेली जागरुता कमालीची असून त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मतदान केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांकरीता असलेल्या सुविधांमुळे त्यांना सुलभरित्या मतदान करता आले.

शिरुर विधानसभा मतदारसंघात पिंपळे जगताप केंद्रावर रखमाबाई दत्तोबा शेळके या १०६ वर्ष वयाच्या, अनुसया काशिनाथ सोंडेकर या १०५ वर्ष वयाच्या आजींनी टपाली मतदानाचा पर्याय न स्वीकारता मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९८ वर्षाच्या विमला दत्तात्रय शिंगणे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ९८ वर्षाच्या लक्ष्मीबाई गराडे, ९० वर्षाच्या कलावती कांबळे यांनी मतदान केंद्रावर जावून मतदानांचा हक्क बजावला. तरुण मतदारांना लाजवेल अशी इच्छाशक्ती त्यांच्या अंगी दिसून आली.

शालू राठोड ह्या प्रसुतीकरीता त्यांच्या माहेरी चाकण येथे गेल्या होत्या. त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत असल्याने त्यांनी प्रसुतीची तारीख १४ मे असतानादेखील रुग्णालयात जाण्यापूर्वी मतदान करण्याची प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या सुचनेनुसार उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी सदर महिलेला चाकण येथून शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथील मतदान केंद्रावर आणण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. श्रीमती राठोड यांनी दुपारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात त्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या.

ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. जिल्ह्यातील तिन्ही मतदार केंद्रात हेच चित्र पहायला मिळाले. काही ज्येष्ठ व्यक्ती आपल्या प्रथम मतदान करणाऱ्या नातवंडांसह तर काही आपल्या वयोवृद्ध मित्रांसह मतदानाला आले. काही ठिकाणी प्रशासनातर्फे नेमलेल्या स्वयंसेवकांनी या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्यासाठी व्हीलचेअरचीदेखील व्यवस्था केली होती. मतदान केंद्रावरील सुविधांबाबत या मतदारांनी समाधान व्यक्त केले.

पुणे कॅन्टोंनमेन्ट विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांच्या चेहऱ्यावर मतदान केल्यानंतर समाधानाची भावना दिसून आली. भारत निवडणुक आयोगाच्यावतीने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाच्यावेळी सहकार्य केल्याबाबत त्यांनी आभार मानले. मतदान आपला हक्क आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य समजून नवमतदारांनी मतदान केले पाहिजे, अशा प्रतिक्रिया यावेळी मतदारांनी व्यक्त केल्या.

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी: रखमाबाई, अनुसया आजी, शालू राठोड, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले मात्र मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येत असलेले तरुण, दिव्यांग नागरिक हे आपले मतदानाचे प्रेरणादूतच आहेत. अशा मतदारांकडून प्रेरणा घेऊन समाजातील सर्व पात्र मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करायला हवे.

अर्चना तांबे, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक: शालू राठोड यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची राष्ट्रीय कर्तव्याप्रती असणारी भावना इतरांनाही प्रेरक आहे. त्यांना प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *