पोलीस नाईक नारायण बर्डे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

कायद्याचा रक्षक बनला भक्षक

  1. नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
    एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८ वर्ष, राहणार आकाशगंगा कॉलनी, आळेफाटा ता. जुन्नर जिल्हा पुणे) या पोलीस कर्मचाऱ्यावर पोस्को अंतर्गत म्हणजेच भा.द.वि. कलम ३५४ अ, ३५४ ड,५०९ बालकांचे लैंगिक अपराधाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली.
    दरम्यान हा पोलीस कर्मचारी गैरकृत्य करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली. खाकी वर्दीतल्याच जबाबदार इसमाने अशा प्रकारे उमलत्या कळीवर अन्याय करावा असा प्रकार घडला आहे. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांनी या घटनेची दखल घेऊन आरोपीला सेवेतून तात्काळ निलंबित करावे अन्यथा नारायणगाव पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा काढू असा इशारा येथील महिला संघटनांनी दिला आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अल्पवयीन मुलगी सोमवार दिनांक २ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येडगाव कोल्हे मळा रस्त्याने खाजगी क्लास मधून पायी घरी चालली होती. आरोपी नारायण बर्डे यांने तुला शंभर रुपये देतो मोटरसायकलवर बस असा आग्रह धरला. मात्र मुलीने नकार दिल्याने त्याने मुली सोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घरी जाऊन मुलगी रडू लागली व तिने घटनेची माहिती आपल्या आजीला सांगितली सीसीटीव्हीच्या आधारे मुलीच्या पालकांनी आरोपीचा तात्काळ शोध घेतला असता त्याच परिसरात हा आरोपी आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला चांगलाच चोप देण्यात आला आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा ओतूरचा पोलीस नाईक नारायण बर्डे याच्यावर भारतीय दंड विधान कलम व बाल लैंगिक अत्याचार यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करित आहेत.
    दरम्यान आपल्याला बेदम मारहाण झाल्याचे सांगत हा पोलीस नारायणगाव येथील खैरे हॉस्पिटल मध्ये दिनांक दोन रोजी ऍडमिट झाला होता. रात्री उशिरा उपचार करून त्याला सोडण्यात आले. या आरोपीला आज खेड येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांनी दिली.
    या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला पोलीस सेवेतून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *