१५ दिवसात ७ बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश

बिबट्या विषयी गैरसमज पसरवू नये असे वनविभागाचे आवाहन

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
मागील पंधरा दिवसात जुन्नर तालुक्यातील ओतूर वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये अवघ्या पंधरा दिवसात सात बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून बिबट्या विषयी गैरसमज पसरवू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक ०५ मे २०२४ रोजी ओतूर वनपरिक्षेत्रा अंतर्गत लेंडेस्थळ, पिंपळवंडी ता. जुन्नर जि.पुणे येथे प्रियंका मनोज हुलवळे यांचेवर सायंकाळी ०५ वाजता शेतात काम करत असताना बिबटयाने हल्ला केला. यानंतर त्यांना उपचारासाठी विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव येथे दाखल करण्यात आले. यानंतर दिनांक. ०८/०५/२०२४ रोजी रुद्र महेश फापाळे रा. काळवाडी ता. जुन्नर जि. पुणे या ८ वर्षाच्या मुलावर सकाळी बिबट्याने हल्ला केला असता त्यात त्याचा मृत्यु झाला तदनंतर दिनांक १०/ मे/२०२४ रोजी श्रीमती नानुबाई सिताराम कडाळे रा. गाजरपट पिपंरी पेंढार हया शेतात काम करत असताना बिबटयाने त्यांचेवर हल्ला केला यामध्ये त्यांचा मूत्यु झाला.

या घटना घडल्या नंतर वनविभागाने हल्ला झालेल्या क्षेत्रामध्ये बिबट जेरबंद करण्यासाठी ४० पिंजरे, २० ट्रॅप कॅमेरे, ड्रोन सर्व्हे व लोकांमध्ये जनजागृती दिवसरात्र करून गस्त सुरू केली. यामध्ये दिनांक. ०८/०५/२०२४ रोजी मौजे लेंडेस्थळ पिंपळवंडी येथे बिबट जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर दिनांक.१०/०५/२०२४ रोजी पिंपरी पेंढार येथे ३ बिबट पकडण्यात यश आले. या विभागामध्ये आत्ता पर्यंत आणखी बिबट्या जेरबंद करण्याची कार्यवाही चालु असून आतापर्यंत ७ बिबटे जेरबंद करण्यात यश आले आहे. यामध्ये हल्ला करणारा बिबट जेरबंद करण्यात आला आहे. यानंतर देखील वनविभागाची बिबट जेरबंद करण्याची कार्यवाही चालु राहणार आहे. सदर कार्यवाहीच्या दरम्यान येडगाव येथील सहयाद्री पुलावर वनविभागाने ३ बिबट सोडण्यात आले अशी अफवा पसरवण्यात आली. व एका स्थानीक युट्युब चॅनेल ने त्याला प्रसिध्दी दिली. यामुळे मौजे काळवाडी व पिंपरी पेंढार येथे बिबट हल्ल्यावेळी लोकांच्या मनात सदर हल्ले हे सोडलेल्या बिबटयाने केलेले आहेत असा समज निर्माण झाला. यामुळे वनविभागावर रोष निर्माण होऊन व गैरसमज निर्माण होऊन आक्रोश दिसुन आला. यामुळे वनकर्मचारी यांना शासकीय कामांत अडथळा व मारहान झाली असुन यामध्ये एक महिला वनरक्षक जखमी झाली आहे.

वनविभागाने सदर नैसर्गिक आपत्ती मध्ये दिवसरात्र काम करुन बिबट जेरबंद करण्याचे काम केलेले असुन सध्या परिस्थीती नियंत्रणात आणन्यात यश मिळाले आहे. तरी या निमित्ताने आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी चुकीच्या बातम्या व अफवा यावर विश्वास ठेवु नये. तसेच प्रसार माध्यमानी बातमी प्रसारीत करताना वनविभागाशी खातरजमा करुनच बातमी दयावी. वनविभाग बिबट समस्या सोडविण्यास प्रयत्नशिल असुन नागरीकांनी चुकीच्या बातम्या व अफवा पसरवु नये. नागरिकांनी व माध्यमांनी सहकार्य ठेवावे. असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनक्षेत्रपाल वैभव काकडे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *