वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शिरूरच्या रामलिंग रोडवरील सोसायट्यांची पोलिस निरीक्षकांनी घेतली बैठक

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. १४/०९/२०२३


सध्या शिरूर शहर व परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असून, रामलिंग रोड येथे चोरट्यांनी अधिक लक्ष केंद्रित केल्याने, शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी, या रोडवरील सर्व सोसायट्यांमधील रहिवाशांची बैठक बोलावली होती. ही बैठक बालाजी एम्पायर या ठिकाणी झाली.
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षकांनी अनेक सूचना केल्या. त्यात रात्रीच्या वेळी घराच्या बाहेरील एखादी तरी लाईट सुरू ठेवणे. बाहेर गावी जाताना शेजारी किंवा जवळच्या काही लोकांना सांगणे. बाहेर जाताना दरवाजाचे लावलेले कुलूप चोरट्यांना दिसू नये यासाठी सेफ्टी डोअर ला लॉक करून, बाहेरची कडी न लावणे. शक्य झाल्यास अलार्म लॉक बसविणे. सी सी कॅमेरे घराबाहेर बसविणे. त्यातील एखादा कॅमेरा तरी रस्त्याच्या दिशेने लावणे. जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्या संशयितांना शोधता येईल. घराभोवतालची विनाकारण व अस्ताव्यस्त पसरलेली झाडे झुडपे कापणे. घराभोवती चोरट्यांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही अशी अडचण नसावी. घराचे दरवाजे भक्कम असावेत. दरवाजावरील कुलूप उच्य प्रतीचे असावे. खिडक्यांचे ग्रिल दाट व भक्कम असावे. शक्यतो सोसायट्यांनी सिक्युरिटी गार्ड नेमावेत. ते निवांत झोपत तर नाहीत ना याची खातरजमा करावी. सिक्युरिटी गार्ड नसतील तर सोसायटी रहिवाश्यांनी स्वतः आळीपाळीने गस्त घालण्याचे नियोजन करावे. सोसायट्यांचे वॉल कंपौंड उंच व त्यावर काटेरी तारेचे असावे. फेरीवाल्यांवर संशय येत असेल तर पोलिसांना तात्काळ कळवावे. विनाकारण निष्पाप लोकांना मार बसेल असे करू नये. एका सोसायटीत चोरटे आले तर दुसऱ्या सोसायटीतील लोकांना सावध करणे. परंतु चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नयेत. सोसायट्यांनी सायरन, अलार्म किंवा अलर्ट सिस्टीम बसवावी. त्या सिस्टिमचा व सी सी कॅमेरा चा ॲक्सेस सिक्युरिटी गार्ड किंवा जबाबदार व सतर्क व्यक्तीकडे द्यावा.
शिरूर पोलीस स्टेशनची हद्द मोठी असून, रात्र गस्त, जिल्हा अंतर्गत गस्त, हायवे गस्त अशा अनेक गस्त असतात. एवढ्या मोठ्या अंतराच्या व विस्ताराच्या तुलनेत पोलीस बळ कमी पडत आहे. त्यामुळे केवळ एकच ठिकाणी आम्हाला लक्ष केंद्रित करता येत नाही, तर आमच्या हद्दीतील सर्वच गावांमध्ये गस्त घालून लक्ष ठेवावे लागते. पोलीस स्टेशनकडे तीन चारचाकी वाहने आहेत. कधी कधी सायरन वाजवले नाही की लोकांना वाटते गाडी आलीच नाही. परंतु सायरन वाजल्यावर चोर सावध होत असतात. त्यामुळे अनेकदा सायरन वाजवले जात नाही. आता आम्ही यावर उपाय म्हणून आमच्या विभागाकडे असणारी सुविधा म्हणजे QR code वापरणार आहोत. ज्याद्वारे गस्त घालणारी गाडी तेथून जाताना स्कॅन करून जाईल. त्यामुळे मलाही कळेल की गस्त नेमकी कोणत्या भागात घातली गेलीय. शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन पोलीस औट पोस्ट आहेत. एक मांडवगण व दुसरे टाकळी हाजी येथे आहे. तिकडेही सरकारी चारचाकी वाहने लागतात. तरीही आम्ही योग्य नियोजन करून यावर मात करत आहोत. लोकांनीही स्वतः पुढाकार घेऊन काही तास रात्र गस्त आळीपाळीने घालणे गरजेचे आहे. मलाही वेळोवेळी भेटून तुमच्याजवळ असणाऱ्या काही कल्पना सुचवत जा, आपण त्यावरही सकारात्मक विचार करू.
काही ठिकाणी आमच्या असे निदर्शनास आलेय की, सोसायटीतील लोकांनीच कम्पौंडच्या बाहेर केरकचरा टाकल्याने आपोआप एक प्रकारचा रॅम्प तयार झालाय. आणि त्यामुळे चोरट्यांना आईता रस्ता तयार झालाय. लोकांनीही सतर्क राहायला हवे.
या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उप निरीक्षक एकनाथ पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गणेश देशमाने, पोलीस अंमलदार विनोद मोरे व रघुनाथ हळणोर, नितेश थोरात, गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे, तसेच रामलिंग रोडच्या सर्वच सोसायट्यांमधील जागृत महिला व पुरुष नागरिक, त्याचप्रमाणे माजी सरपंच, उपसरपंच, माजी ग्राम पंचायत सदस्य व अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *