खारघर | ‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’ च्या घोषणांमध्ये उत्तर भारतीयांचा बारणे यांना पाठिंबा..

‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’ च्या घोषणांमध्ये उत्तर भारतीयांचा बारणे यांना पाठिंबा

उद्धव ठाकरे बहुरूपी तर श्रीरंग बारणे कट्टर शिवसैनिक – डॉ. संजय पांडे

सर्व उत्तर भारतीय मतदार बारणे यांच्या पाठीशी – डॉ. संजय पांडे

खारघर, दि. 28 एप्रिल – ‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडत उत्तर भारतीयांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला.

खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे उत्तर भारतीयांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ. संजय पांडे, सरचिटणीस चिराग गुप्ता, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तसेच नितीन पाटील, संतोष शर्मा, प्रदीप शुक्ला, आर. के. त्रिपाठी, इंदू दुबे, शैलेश सिंग, विनोद उपाध्याय, संतोष दीदी, सुमित सहाय आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघातील उत्तर भारतीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. संजय पांडे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर भारतीयांशी संवाद साधला. सनातन हिंदू धर्माच्या विरोधात सातत्याने काम करणारा काँग्रेस पक्ष, स्टॅलिनसारखे नेते यांच्या हातात हात घालणारे उद्धव ठाकरे हे बहुरूपी आहेत, अशी टीका त्यांनी केली. श्रीरंग बारणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे पालन करणारे कट्टर शिवसैनिक आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

 

भारतात 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदू धर्म संरक्षण पर्व सुरू झाले. आम्ही हिंदू आहोत हे आपण ताठ मानेने सांगू शकतो, ते केवळ मोदी यांच्यामुळे. अयोध्येत रामलल्लांना श्रद्धापूर्वक परत आणून मोदींनी कोट्यवधी हिंदूंची मने जिंकली आहेत. हिंदू हितासाठी व देशहितासाठी मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार अद्दल घडवतील, असा इशाराही त्यांनी दिला. गरीब, शेतकरी, महिला व युवा यांच्या कल्याणासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विरोधक डोळ्यांवर काळी पट्टी बांधत असतील तर त्यांना गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कसा दिसणार, असा सवाल बारणे यांनी केला. पनवेल परिसराचा पाणी प्रश्न येत्या दोन-तीन महिन्यात सुटलेला असेल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *