जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज वृक्षदायी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ. प. शिवाजी महाराज मोरे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षदायी प्रतिष्ठान आणि मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने शंभर देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वड, पिंपळ, कडुलिंब अशी सात ते आठ फूट उंचीच्या झाडांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांच्या वतीने वृक्षमित्र शिवाजी मोरे महाराज यांचा तुकोबारायांची पगडी, उपरणे, वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी सरपंच संतोष हगवणे, पवन चौधरी, राकेश वाघमारे, मंगेश घुरडे, शरद मेथे, सुनील निंबोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, की वृक्षमित्र शिवाजी मोरे यांचे सांप्रदायिक आणि पर्यावरणावर मोठे काम आहे. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश प्रत्यक्ष उतरवण्यासाठी शंभर झाडे लावण्यात आली. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे.