भोसरी : विविध आयुर्वेदिक रोपांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा.

संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, भोसरी या ठिकाणी शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. पर्यावरण पूरक शिक्षक दिन साजरा केल्याने भोसरी आणि परिसरात “शिक्षक दिन “कौतुकाचा विषय ठरला आहे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानव दानव बनणे हा त्याचा पराभव, परंतु मानव महामानव होणे हा त्याचा चमत्कार, तर मनुष्य मानव होणे हा त्याचा विजय आहे हे विचार सांगणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षकही होते. शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल चे संस्थापक-अध्यक्ष सन्माननीय श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर , संचालिका सौ सुनीता ढवळेश्वर शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी सौ शुभांगी महाबरे, श्री अजित लक्ष्मणराव मेदनकर व विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरूपात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, दीपप्रज्वलन करून शिक्षक दिनास सुरुवात केली. प्राथमिक विभाग प्रमुख सौ. स्वाती मोघे , सौ.मृणाल लिमये यांनी सूत्रसंचालन केले तसेच विद्यार्थ्यांनी गायनातून , भाषणातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना नम्र पूर्वक भेटकार्ड, भेटवस्तू ही दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे औक्षण करून आशीर्वाद घेतले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवलिंग ढवळेश्वर सर , सौ. सुनीता ढवळेश्वर मॅडम यांनी शाळेतील शिक्षकांचा श्रीफळ, शाल, भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी प्रत्येक शिक्षकाच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव दिसून येत होता. शाळेतील विद्यार्थी हेच आज ज्ञानदानाचे कार्य म्हणून शिक्षक झाले होते. प्रत्येक वर्गात वेगवेगळी सजावट केलेली दिसून येत होती. प्रत्येक वर्ग शिक्षकाने या कामी त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यानंतर या विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार सुद्धा विविध पुस्तके देऊन करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांसाठी कृतज्ञता म्हणून शिक्षक पालक प्रतिनिधी संघाने प्राथमिक स्वरूपात काही गमतीचे खेळही ठेवले होते. सर्वच शिक्षकांनी त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आनंद घेतला. पर्यावरणाचा जागर म्हणून शिक्षक पालक प्रतिनिधी संघाने शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयुर्वेदिक वनस्पतीची रोपे, स्मृती चिन्ह भेटवस्तू स्वरूपात दिले. पर्यावरण पूरक शिक्षक दिन साजरा होत असल्याने संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक पालक संघाचे मनापासून कौतुक केले . संस्थाचालक श्री ढवळेश्वर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ,सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई रानडे ,भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम अशा सर्वच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणाविषयीचे त्यांचे कार्य आणि महती याविषयीचे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. जो संपूर्ण आयुष्यभर शिकत राहतो तसेच आपल्या विद्यार्थ्यांकडूनही एखादी गोष्ट शिकण्यात ज्याला कधीही कमीपणा वाटत नाही तो खरा शिक्षक असतो असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. श्रद्धा ,भाव आणि विश्वास ठेवूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे असे मत सौ. शुभांगी सुतार आणि अकीला सय्यद मॅडम यांनी व्यक्त केले. काळया फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे
उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपमुख्याध्यापिका सौ रूपाली खोल्लम यांनी आभार व्यक्त केले.
राष्ट्रगीत होऊन शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *