बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०५/०९/२०२३
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतील निर्णयनुसार, शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज शिक्षक दिन हा निषेध दिन म्हणून साजरा केला. सर्व शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्व कुटुंबाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. स:द्यस्थितीमध्ये सततच्या ऑनलाईन माहिती मागविणे, विविध लिंक भरणे, विविध उपक्रम राबविणे, त्यांची माहिती तातडीने देणे, बी.एल.ओ. मतदार नोंदणीचे काम करणे, सेतू अभ्यासक्रम तसेच पायाभूत चाचण्या घेणे, पेपर तपासणे, शालेय पोषण आहार योजना राबविणे, शिक्षक परिषदा व प्रशिक्षणांना उपस्थित राहणे, त्यासंदर्भातील लिंक भरणे, शालेय व्यवस्थापन समिती बैठका घेणे, इतिवृत्त लिहिणे, विनोबा ॲपवर सातत्याने माहिती भरणे, पाठ्यपुस्तक गणवेश योजना राबविणे यांसारख्या विविध अशैक्षणिक कामांमुळे, शिक्षक हा अध्यापनापासून दुरावला गेला असून मानसिक दृष्ट्या त्रस्त झालेला आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
पुणे जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रशासकीय, आर्थिक व इतर प्रश्न कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक कालावधीपासून प्रलंबित आहेत. अनेकवेळा मागणी करूनही न्याय मिळालेला नाही. याबाबतचे निवेदनही यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना देण्यात आले.
“आम्हाला शिकवू द्या” ही शासनाकडे आग्रहाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून, अशैक्षणिक कामे व अतिरिक्त ऑनलाईन कामे याचा निषेध म्हणून, ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी शिक्षकांनी काळ्या फिती लावून, निषेध व्यक्त करत अध्यापनाचे काम केले आहे.
हे निवेदन देतेवेळी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिरूर तालुका अध्यक्ष संतोष गावडे, शिक्षक संघ नेते संतोष शेवाळे, पतसंस्थेचे माजी संचालक सोमनाथ गायकवाड, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष बबनराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष राहुल घोडे, तालुका समन्वयक रमेश उबाळे, शिक्षक नेते श्रीकांत निचित उपस्थित होते.