कोविड काळात कामात हलगर्जी केल्यास फौजदार कारवाई करणार – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

राजू थोरात तासगाव
सांगली प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता जास्त असून तिची व्यापकताही मोठी आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी महसुल व संबधित विभागाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करावे. समन्वयामध्ये अभाव झाल्यास यंत्रणांचे काम बिघडु शकते. कोविडच्या काळात जनतेमधून तक्रारी येणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घेणे आवश्यक आहे. कोविड कालावधीत कामामध्ये हालगर्जीपणा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.

तहसिलदार कार्यालय शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, प्रांताधिकारी ओमकार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील तसेच वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर,पोलीस अधिकारी उपस्थितीत होते.

राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. यामध्ये सरसकट विलगीकरण न करता ज्या रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्यासाठी व्यवस्था नाही, तसेच जे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण् शासकीय नियमांचे पालन न करता बाहेर फिरत असतील अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. तसेच जे रुग्ण् आपल्या कुंटुबाला संसर्ग होऊ नये अथवा आपल्यामुळे कोरोना पसरु नये यासाठी स्वत:हुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यास तयार असतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोईसुविधांची वारंवार तपासणी करण्यात यावी. ज्या सुविधा उपलब्ध नसतील त्या तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात. सद्यस्थितीत शिराळ्यात सहा ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण सुरु असुन त्या ठिकाणी रुग्णांची संख्या संस्थेच्या मर्यादे नूसार ठेवण्यात यावी. तसेच ज्या गावांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे त्या गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्यात यावा. संबधित गावातील ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करुन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँक हा उपक्रम राबविण्यात येत असून या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँकचा प्रभावी वापर शिराळा तालुक्यात करण्यात यावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य यंत्रणा व महसुल यंत्रणेने बेड मॉनिटरिंग सिस्टीम अपडेट ठेवावी. हायरिस्क रुग्णांबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधुन सदर रुग्ण सांगली अथवा मिरज या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. बेडसाठी रुग्णांची हेळासांड होऊ नये यासाठी बेडची माहिती हॉस्पिटलच्याबाहेर दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे ती अपडेट ठेवण्यात यावी. शिराळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी औषधे, आवश्यक वैद्यकीय साहित्य तसेच आवश्यक असणारा निधीची विहित वेळेत मागणी जिल्हा प्रशासनाला सादर करावी. प्रत्येक महिन्याला या संबधिचा स्थानिकस्तरावर आढावा घेऊन आवश्यकते नूसार व प्रसंगानारुप स्थानिक पातळीवरही खरेदी प्रक्रिया राबवावी. लसीचा पुरवठा ज्या ज्या प्रमाणात होईल त्यानुसार वरिष्ठ पातळीवरील आदेश मिळतील त्यानुसार लसीकरणाचे कामकाज व्हावे, लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये या बाबतचे नियोजन करण्यात यावे, त्याचबरोबर स्तनदा माता, गरोदर माता यांनाही लसीकरण करण्यात येणार असल्याने त्यांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच शासनाच्या निर्देशानुसार त्यांचेही लसीकरणाबाबतचे नियोजन करण्यात यावे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोठ्याप्रमणात असल्याने याबाबतची नोंदणी प्रक्रियानुसारच लसीकरण करण्यात यावी. तसेच आरोग्य व संबधित विभागातील अधिकारी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे असे आदेश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांची शिराळा येथील उपजिल्हारुग्णालयाला भेट
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. ज्या विभागांमध्ये कमतरता जाणवल्या त्या तातडीने पुर्ण कराव्यात असे आदेश देऊन रुग्णालयात ॲडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना दिवसातून दोन वेळा रुग्णांवर केलेल्या उपचारांची माहिती देण्यात यावी, असे सांगून हॉस्पिटलच्या दर्शनीभागात माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यन्वीत करण्यात यावा. तसेच ऑक्सिजन प्लँटच्या सुरक्षतेची संपुर्ण खबरदारी घेण्यात यावी. टँकमध्ये शिल्लक असलेल्या ऑक्सिजनची वेळोवेळी नोंदी घेऊन शिल्लक साठ्याची माहिती अद्यावत ठेवण्यात यावी. ऑक्सिजन प्लँटच्या ठिकाणी प्रशिक्षीत कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *