मंत्री दादा भुसेंची पोलिसांसमोरच दोघांना शिवीगाळ आणि मारहाण; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

२७ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत दादा भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस दाखल करणार? माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केली. सर्वोच्च न्यायालयात रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली. आता बोला.

माझ्यासाठी वकिलांची मोठी फौज आणि पोलिसांची खोटी प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात द्यायला लावली. मी सराईत गुन्हेगार आहे, असे पोलीस सर्वोच्च न्यायालयात पत्र देतात… वाह साहेब आपण मला फाशी देऊ शकत नाही, किंवा मुडदाही पाडू शकत नाही,असे आव्हाड यांनी म्हटलं. माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला, जिने रात्री आपली भेट घेतली, तिच्याविरोधात जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचलंत. आपण मित्र होतो… विसरलात,असा प्रश्न आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *