तृतीयपंथीयांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबीर

दि. २७/१२/२०२२
पुणे


पुणे : समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी एका विशेष शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

भवानी पेठ येथील संत ज्ञानेश्वर समाज मंदिर येथे आयोजित या शिबिरास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, मनपा क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तालुका समन्व्यक मंगेश गाडीवान, सोस्वा ट्रेनिंग इन्स्टिट्युट व तृतीया फाऊंडेशन पुणेचे सदस्य, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या प्रेरणा वाघेला, आशिका पुणेकर, कादंबरी, मित्र क्लिनिकचे मधु गुरु आदी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर म्हणाल्या, तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यामध्ये राज्यात पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून जिल्ह्यात आतापर्यंत ३४३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क व त्याचे महत्व सांगून जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी करावी. तसेच https://transgender.dosje.gov या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी तृतीयपंथी ओळखपत्रासाठी ४२, मतदार ओळखपत्रांसाठी ३५, संजय गांधी निराधार योजनेसाठी ७७ आणि आधार कार्डसाठी १८ तृतीयपंथीयांनी नोंदणी करून योजनांचा लाभ घेतला.

कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट भोसरीचे प्रतिनिधी, संजयगांधी निराधार योजना, मतदार नोंदणी व आधार कार्ड नोंदणी विभागाचे कर्मचारी व तृतीयपंथी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *