आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या माध्यमातून पिंपळेगुरवमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. २० एप्रिल २०२१ पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. रुग्णांना सेवा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सुद्धा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर गुरूवारपासून (दि. २२) कार्यान्वित झाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी नेहमीच झटत असतात. आता कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल शहरातील इतर सर्व राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण करणारे ठरेल.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप व त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या माध्यमातून पिंपळेगुरवमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी, पिंपळेसौदागर या भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार मिळू शकेल.

कोविड केअर सेंटर नेमके कुठे आहे?

आयुश्री हॉस्पिटल कोविड केअर सेंटर, पिंपळेगुरव ७३/८, साई दर्शन ‘ए’ बिल्डिंग येथे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये २० बेड ऑक्सिजनचे आहेत. डॉ. कांचन सराफ, डॉ. दिनेश फस्के, डॉ. जितेंद्र पटेल यांची टीम या कोरोना सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची सेवा करणार आहेत. हे सेंटर गुरूवारपासून (दि. २२) कार्यान्वित झाले आहे. माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांनी या सेंटरची गुरूवारी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *