तर आमचाही संयम सुटू शकतो; शरद पवार यांचा कर्नाटक सरकारला इशारा

०७ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमा प्रश्नाच्या संदर्भातील विविध विधाने ही देशाच्या ऐक्याला धोका आणणारी आहेत. सीमाभागात हिंसाचाराच्या घटना आताच कशा घडल्या आहेत. त्यातून जर काही अघटित घडल्यास त्याला बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. आमचाही संयम सुटू शकतो. याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुंबईत मंगळवारी दिला.

माझा सीमा प्रश्नांशी अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. मला सत्याग्रह करावा लागला होता. प्रसंगी लाठय़ा खाव्या लागल्या आहेत. ज्यावेळी असे काही सीमाभागात घडते त्यावेळी सीमाभागातील घटक माझ्याशी संपर्क साधतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास मज्जाव केला जातो. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन आपणास धीर द्यावा, असा संदेश केला आहे. त्यामुळे गरज पडली तर मी बेळगावला जाणार, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *