१८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के तरुणांची मतदार नोंदणी नाही

०८ डिसेंबर २०२२

पुणे


राज्याच्या लोकसंख्येत १८ ते १९ वर्षे वयोगटातील ३.५ टक्के तरुण आहेत. मात्र त्यापैकी केवळ ०.३४ टक्के तरुणांची मतदार यादीत नोंदणी आहे. २० ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या १८ टक्के असताना मतदार यादीत १२ टक्के तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के, २० ते २९ वयोगटातील ३० ते ३५ टक्के मुले-मुली मतदार यादीत नाहीत, अशी माहिती देत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तरुणांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील १५ शाळा व ४३ महाविद्यालयांत स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक साक्षरता मंडळांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या देशपांडे बोलत होते.

देशपांडे म्हणाले, की लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शाळा, महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुण्यामध्ये हाती घेतला आहे. निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्प यशस्वी होण्यासाठी काही सवलती देण्याचे ठरवले आहे. त्यात विद्यार्थ्यांची महाविद्यालय सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाची नोंद मोबाइल ॲपच्या माध्यमातून होणार असून विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पुढील एकदोन वर्षात चांगले बदल घडवण्यासाठी सर्वांच्या योगदानातून हा राष्ट्रीय स्तरावरील एक पथदर्शी प्रकल्प ठरेल. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात १८ ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या २३ लाख असताना त्यापैकी केवळ ११ ते १२ लाख जणांनी मतदार नोंदणी केली आहे. ही बाब लक्षात घेऊन मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाने महाविद्यालयांच्या सहकार्यातून ४४२ महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या विशेष शिबिरांतून ४३ हजार पेक्षा जास्त मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीयांनी नोंदणी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *