नेभळट सरकार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर

०६ डिसेंबर २०२२


चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर टाकण्याची नामुष्की येताच शिंदे-फडणवीस सरकारने आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी सारवासारव सुरू केली. दरम्यान, यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली असून हे नेभळट सरकार असल्याचं म्हटलं आहे. सीमा प्रश्नावर विरोधक काय करणार? या प्रश्नावर आम्ही सरकारही चालवू आणि कर्नाटकलाही जाऊ, असा टोला ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दिल्ली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आक्रमक भूमिकेवर भाष्य करणं टाळलं. मात्र, ‘बेळगांवमध्येच नव्हे तर, देशाच्या कुठल्याही भागांमध्ये जायला कोणीही कोणाला रोखू शकत नाही’, असं स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे बोम्मई यांना चपराक दिली.बेळगाव प्रश्नावर राज्य सरकार नेमस्त भूमिका घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्यावर, बेळगावसंदर्भात काही लोक मतप्रदर्शन करत आहेत, त्यांना एवढेच सांगायचं आहे की, आक्रमकपणा कसा दाखवायचा हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. मी बेळगावच्या प्रश्नावर ४० दिवस तुरुंगवास भोगला होता. ते मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) असताना बेळगावच्या जनतेला मिळणारे योजनांचे अनुदान बंद करण्यात आले होते. विद्यमान सरकारने संबंधित योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. सीमेवरील गावांसाठीही म्हैसाळ पाटबंधारे योजनेचे विस्तारीकरण केले जात आहे, त्यासाठी राज्य सरकार २ हजार कोटी देत आहे, असं शिंदे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *