विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०२१ मध्ये भूषण सहदेव तांबे प्रथम क्रमांकाचे मानकरी

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
०८ जानेवारी २०२२

ओझर


अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ या संस्थेने आयोजित केलेल्या विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२१ मध्ये अनुभवकथन स्पर्धेत भूषण सहदेव तांबे यांनी प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले आहे. बक्षिसाचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके असे आहे. सदर स्पर्धेच्या लेखनाचा विषय “रानातला पाऊस” हा होता. कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी यांच्या ८६ व्या जयंतीदिनानिमित्त ३ सप्टेंबर २०२१ या दिवशी ही विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धा घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल ०७ जानेवारी २०२२ या दिवशी घोषित करण्यात आला. देश-विदेशातून, भिन्नभिन्न राज्यांतून मराठी साहित्य क्षेत्रातील आणि शेतकरी चळवळीशी सलंग्न असणाऱ्या साहित्यिक मान्यवरांनी या स्पर्धेत आवर्जून सहभाग घेतला होता आणि आपले साहित्य प्रवेशिका म्हणून स्पर्धेत सादर केले होते. अनेक प्रवेशिका आल्याने स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षकांचे कौशल्यसुद्धा पणाला लागले होते.

शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ या संस्थेने आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ८ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. सदर स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते भूषण सहदेव तांबे यांचे सर्व मराठी साहित्य क्षेत्रात खूप कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक कार्यांसाठी आणि वाटचालींसाठी देखील खूप शुभेच्छा देण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *