कृषीपंप थकबाकीतील वसुल रकमेपैकी ३३% रक्कम गावाच्या पायाभुत सुविधांवर खर्च करणार- अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार

राजुरी दि.१९ (विभागीय संपादक रामदास सांगळे):- कृषी धोरण २०२० योजनेच्या माध्यमातुन गावातुन वसुल होणाऱ्या कृषीपंप रकमेतुन ३३% रक्कम संबंधीत गावाच्या पायाभुत सुविधांसाठी खर्च करणार असल्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी राजुरी येथील कृषीपंप ग्राहक मेळाव्या प्रसंगी दिले व जास्तीत जास्त कृषीपंप ग्राहकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले.
          गुरुवार (दि.१८) रोजी राजुरी (ता.जुन्नर)येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका व महावितरण कंपणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कृषीपंप वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटणमंत्री बाळासाहेब औटी होते तर  कार्यक्रमाचे उद्घाटन महावितरणचे पुणे ग्रामीण मंडलचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार व माजी पं.स. सभापती दिपक आवटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी कृषीपंप ग्राहकांच्या प्रातिनीधीक स्वरुपात समस्या मांडल्या विनामीटर शेती पंपांचा जोडभार ३ हॉ. पॉ. ऐवजी ५ हॉ. पॉ.; ५ हॉ. पॉ. ऐवजी ७.५ हॉ. पॉ.; ७.५ हॉ. पॉ. ऐवजी १० हॉ. पॉ. याप्रमाणे वाढविण्यात आला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू असलेल्या शेती पंपांचे वीज बिल मीटर रीडींग न घेता सरासरी म्हणून १०० ते १२५ युनिटस म्हणजे दुप्पट वा अधिक टाकले जात आहे. मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांचे वरही सरासरी १०० ते १२५ युनिटस आकारणी होत आहे. या पद्धतीने वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासुन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर आहेत व सुरु आहेत, तेथे प्रत्यक्ष रीडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. वीज बिले पूर्ण दुरुस्त होतील याची काळजी घेण्याचे आवाहन केले .
           महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी कृषी धोरण २०२० विषयी सविस्तर विश्लेषण केले यात प्रामुख्याने गावातुन वसुल होणाऱ्या कृषीपंप थकबाकी रकमेतुन ३३% रक्कम गावाच्या पायाभुत सुविधांसाठी खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले. दिवसा वीज मागणी असलेल्या गावांनी आवश्यक जागा महावितरणला उपलब्ध करुन दिल्यास सौर प्रकल्पाच्या माध्यमातुन दिवसा वीज पुरवठा देखील दिला जाणार असल्याचे पवार यांनी सांगीतले. तसेच महिला बचतगट, साखर कारखाने, सुतगिरण्या यांच्या माध्यमातुन वीज देयक भरणा स्विकारल्यास त्यांना योग्य मोबदला दिला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. व सदर योजनेचा लाभ प्रत्येक कृषीपंप ग्राहकाने घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन केले.
             दरम्याण ओतुर उपविभागातील आंबेगव्हाण, रोहोकडी ही गावे थकबाकीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे वीज कर्मचारी अमीत बनकर यांनी ४४ ग्राहकांकडुन १४ लाख ५७ हजार रुपये वसुली केली त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दरम्याण राजुरी येथील शेतकरी आसिफ अब्दुल महालदार या शेतकऱ्याचे रुपये दोन लाख सहा हजार रुपयांचे वीज देयक कृषीपंप वीज धोरण २०२० योजनेच्या माध्यमातुन रुपये ६८ हजार ९०० रुपये करण्यात आले व सदर वीज देयक रोख स्वरुपात अधिक्षक अभियंता पवार याना सोपविण्यात आले. दरम्याण सुमारे ३०० कृषीपंप वीज देयकांची योजनेच्या माध्यमातुन दुरुस्ती करुन देण्यात आली तर सुमारे ५० ग्राहकांना नवीन वीज जोडणी संदर्भात माहिती देण्यात आली.
           यावेळी मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता एच ए नारखेडे, अ.भा. ग्राहकपंचायतीचे जुन्नर तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, समर्थ एज्युकेशन ट्रस्टचे वल्लभशेठ शेळके, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्र्वर शेळके, उंचखडक येथील सरपंच सुवर्णा कणसे, बोरी येथील सरपंच वैशाली जाधव, आळेफाटा येथील उपकार्यकारी अभीयंता श्रीकांत लोथे, नारायणगाव उपकार्यकारी अभियंता सोनवणे आदींसह, संतोष नेहरकर, कौसल्या फापाळे,अशोक घोडके मोठ्या संख्येने अ.भा. ग्राहक पंचायतीचे पदाधीकारी व कृषीपंप ग्राहक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम औटी तर आभार राजुरी गावचे सरपंच प्रिया हाडवळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *