गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर उमेदवार दिला नव्हता, अंधेरीची निवडणूक बिनविरोध करा – शरद पवार
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतील जागा रिक्त आहे. या रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे, असं म्हटलं. या निवडणुकीनंतर मिळणारा कालावधी दीड वर्षाचा आहे. रमेश लटके यांच्या निधनानं जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या पटेल यांनी अर्ज दाखल केला आहेत. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेत गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहणार असेल तर आम्ही म्हणजे राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला होता, असं शरद पवार म्हणाले.
रमेश लटके यांच्या मुंबई महानगरपालिका, विधिमंडळातील योगदान व या निवडणुकीतील निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं शरद पवार म्हणाले. ही निवडणूक प्रतिष्ठेची न करता महाराष्ट्रात चांगला मेसेज जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध विजयी करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.