बाळासाहेब हे नाव कोणाचेही असू शकते – भास्कर जाधव
आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२
शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली.
शिंदे गटाला मिळालेल्या नावावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने पहिल्याच प्रयत्नात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिंकले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. आमच्या पक्षाच्या नावात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचीही नावे आहेत. आम्ही चिन्हांबाबत जे तीन पर्याय दिले होते, त्यापैकी एक मिळाला आहे. म्हणून आम्ही आनंदी आहोत. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे. पण बाळासाहेब हे नाव कोणाचेही असते, अशा शब्दांत जाधव यांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे. आमच्या नावात बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.