माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ ऑक्टोबर २०२२
 
पिंपरी


स्त्रियांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी महापालिकेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाला शहरातील महिलावर्ग  उस्फुर्त प्रतिसाद देत स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत आहेत, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमा अंतर्गत थेरगाव येथील कामगार भवन येथे महापालिकेमध्ये  कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आज करण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.  यामध्ये महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांचा  मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे,  ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय दादेवार,  वैद्यकीय अधिकारी डॉ. आसावरी ढवळे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, शुभांगी चव्हाण, माया वाकडे, सिमा सुकाळे, लेखापाल चारुशीला जोशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी,कर्मचारी,परिचारिका आणि नागरिक उपस्थित होते.

 

महापालिकेच्या वतीने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सूचनांनुसार नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान दि.२६ सप्टेंबर पासून राबविण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत १८ वर्षे वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असून आवश्यकतेनुसार रुग्णालय, अंगणवाडी स्तरावर उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामधील विविध झोपडपट्टी, अतिजोखमीचा भाग अशा ठिकाणी महिला व मातांच्या तपासणीसाठी बाह्यसंपर्क तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तसेच महापालिकेच्या  सर्व रुग्णालयांमध्ये अॅनिमिया मुक्त कॉर्नरमध्ये रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. रुग्णालय स्तरावर विशेष सोनोग्राफी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त गरोदर तपासणी करण्यात येत आहे.  ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियान कालावधीमध्ये महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये येथे सोनोग्राफी, एक्स-रे, सेवा, समुपदेशन, औषधोपचार आदी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशी माहिती वैद्यकीय विभागाच्या डॉ सुनीता साळवे, डॉ नासेर अलवी यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *