मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन – रोहित पवार

१३ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. दोन्ही राज्यातील राजकीय भयानक तापलेले असताना, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना येण्यास बंदी घातली असली तरी आज राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी बेळगाव दौरा केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणांना भेटी देत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील नेत्यांच्या भेटीही घेतल्या.

रोहित पवारयांनी बेळगावहून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी बेळगावला जाऊ शकतो तर सीमा समन्वयक मंत्री का जाऊ शकत नाहीत? आमचे नेते १९ तारखेला जो आदेश देतील तो पाळला जाईल, ज्या कोणत्या नेत्याला बेळगावला जाण्यास सांगतात त्याचे पालन करतील, असेही नमूद केले.

रोहित पवार यांना राज ठाकरेंबाबत विचारण्यात आले असता त्यांनी खोचक शब्दात टिप्पणी केली. मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे रोहित पवार म्हणाले. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *