शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी असणार – शहाजी पाटील
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२
शिंदे गटआणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दसरा मेळाव्यावरूनच या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीका होत आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रर्शन करण्यात येत आहे. शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर टीका करत ठाकरेंचा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण दिल्याचा दावा केला आहे.
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीवरील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 30 ते 35 हजार शिवसैनिक जाणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला आंदण दिला असल्याची टीका शहाजीबापूंनी केली आहे. उद्या होणाऱ्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे. तर बीकेसीवर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे आमचा मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.