रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि.१९ जुन २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड १९ चा सरासरी पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी विचारात घेता पिंपरी चिंचवड क्षेत्रातील निर्बंध दि. २१.०६.२०२१ पासून काही अंशी शिथील करण्यात येत असुन शनिवार आणि रविवार वगळता आस्थापना तथा उपक्रम सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. आयुक्त राजेश पाटील यांनी आज याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी निर्गमित केलेले आदेश खालीलप्रमाणे –
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरिता प्रसारणाची साखळी प्रभावीपणे खंडित करण्यासाठी लावलेले निर्बंध जिल्हानिहाय / प्रशासकीय युनिट निहाय शिथिल करणे तसेच विविध आर्थिक आणि सामाजिक उपक्रम नियोजनबद्ध सुरु करण्याच्या अनुषंगाने शासनाने सुधारित आदेश निर्गमित केलेले आहेत.
ज्याअर्थी, उपरोक्त संदर्भ क्र. ६ मधील आदेशान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
ज्याअर्थी राज्यातील कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरिता प्रसारणाची साखळी प्रभावीपणे खंडित करण्यासाठी लावलेले निर्बंध जिल्हानिहाय / प्रशासकीय युनिट निहाय शिथिल करणे तसेच विविध आर्थिक आणि सामाजिक उपक्रम नियोजनबद्ध सुरु करण्याच्या अनुषंगाने शासनाने सुधारित आदेश निर्गमित केलेले आहेत.
ज्याअर्थी सदर अधिनियमांतर्गत राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड-१९ या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अमलात आलेले आहेत. महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड १९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केलेले आहे. त्याअनुषंगाने साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करीत आहे.
१) खालील नमूद आस्थापना / उपक्रम सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत सुरू ठेवणेस परवानगी राहील –
Ø पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी इकडील दिनांक ०५.०६.२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
Ø अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त ( Non-Essential Shops ) इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
Ø सार्वजनिक वाचनालय सुरु राहतील.
Ø स्पर्धा परीक्षा क्लासेस / कोचिंग क्लासेस ( Coaching Classes )/ अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था ( Training Institute ) हॉलच्या आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील.
Ø मॉल ५०% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह ( Single Screen and Multiplex ) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.
Ø व्यायामशाळा ( Gym ), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार ( by appointment ) फक्त सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C. ) सुविधा वापरता येणार नाही.
Ø कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व सुरु राहतील.
Ø मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
२) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार रात्री १०.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. फक्त घरपोच सेवा ( Home delivery ) रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील, स्वतः जावून पार्सल आणणे ( Take away ) बंद राहील. शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा ( Home delivery ) रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील, स्वतः जावून पार्सल आणणे ( Take away ) बंद राहील.
३) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा ( Airport Services ), बंदरे सेवा ( Port Services ) यांच्या कर्मचा-यांना प्रवास करणेस परवानगी राहील.
४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० व दुपारी ०४.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये ( Government Offices and Emergency Services required for Covid 19 Management ) १००% क्षमतेने सुरु राहतील.
शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयां व्यतिरिक्त ) ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.
६) सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( working days ) ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
७) सर्व आउटडोअर स्पोर्ट्स ( Outdoor games ) हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. तसेच इनडोअर स्पोर्ट्स ( Indoor games ) सकाळी ०५.०० ते ०९.०० व सायंकाळी ०४.०० ते ०७.०० या वेळेत सुरु राहतील.
८) सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास ५० लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत परवानगी राहील.
९) लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
१०) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
११) विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा ( General Body ) या ५०% उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
१२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.
१३) ई – कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
१४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी ) प्रतिबंध राहील. तसेच रात्री १०.०० नंतर अत्यावश्यक कारण ( Valid reason ) वगळता संचारबंदी लागू राहील.
१५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने ( Without standing ) सुरु राहील.
१६) माल वाहतूक करणा-या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्ती ( चालक + क्लीनर / मदतनीस ) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.
१७) खाजगी वाहनातून, बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वे मधून आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर e-pass असणे बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणा-या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र e-pass आवश्यक राहील.
१८) Export oriented units ( Including MSMEs that need to fulfill export obligation) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील.
१९) खालील उत्पादन क्षेत्र / उद्योग नियमितपणे सुरु राहतील.
अ) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ( Essential goods manufacturing units ) – (अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणा-या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह ).
ब) सतत प्रक्रिया करणारे उद्योग (All continuous process industries) – (Units that require process that are of such a nature that these cannot be stopped immediately and cannot restart without considerable time requirement )
क) राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्योग. ( Manufacturing of items that are significant to National Security and Defence )
ड) Data Centers/Cloud Service providers/ IT Services supporting critical infrastructure and services.
२०) उपरोक्त मुद्दा क्र १८ व १९ येथे नमूद केलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कर्मचारी ने-आण कण्यासाठी संबंधित उद्योगांनी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी. सदर कर्मचा-यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही.
२१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, बाजार, कंपनी, फॅक्टरी, बांधकाम स्थळ ( Construction Site ), हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट इ. ठिकाणी काम करणा-या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी ( RAT ) दर पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक राहील.
२२) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
२३) सदरचे आदेश हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड १९ सरासरी पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी यांचे टक्केवारीनुसार शासनाने निश्चित केलेल्या लेवल विचारात घेऊन केलेले आहेत. जर त्यामध्ये वाढ / कमी झाल्याचे आढळून आल्यास याबाबत आढावा घेऊन सुधारित आदेश निर्गमित केले जातील.
कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.
सदर आदेश दि. २१.०६.२०२१ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.