नारायणगाव : मानवी मृतदेह सांगाडा स्वरूपात सापडल्याने पिंपळगाव येथे खळबळ…

मानवी मृतदेह सांगाडा स्वरूपात सापडल्याने पिंपळगाव येथे खळबळ…

 

नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील आमराई येथील उसाच्या शेतामध्ये उसाची तोडणी सुरू असताना अंदाजे ७५ वर्ष वय असलेल्या पुरुषाचा हाडाचा सांगाडा आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हा सांगाडा पिंपळगाव येथील सहा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या बाबामीयाँ सय्यद मोमीन (वय वर्षे ७५) यांचा असावा असा प्राथमिक अंदाज पिंपळगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तसेच त्यांचा मुलगा हारून यांनीही या हाडाचा सांगाडा माझे वडिलांचा असल्याचे म्हटले आहे. तथापी बिबट्याच्या हल्ला झाल्याने ही घटना घडली असावी असेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. वैद्यकीय तपासणी नंतरच हा मृतदेह कोणाचा हे स्पष्ट होणार आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचा संशय…

दरम्यान घटनेची सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील बाबामीयाँ सय्यद मोमीन (वय वर्ष ७५) हे गेले सहा महिन्यापासून बेपत्ता होते. या बाबत त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात त्यावेळी फिर्याद दिली होती.आज ता. (२० रोजी) विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे मजूर सकाळी सात वाजता ऊस तोडणी करीत असताना उसाच्या सरीत हाडांचा सांगाडा आढळून आला. मजुरांनी या बाबतची माहिती तात्काळ ऊस मालक हारून बाबामियाँ मोमीन यांना दिली. मुलगा हारून मोमीन तातडीने घटनास्थळी आल्यावर त्यांनी सांगड्याची पाहणी केली व अंगातील कपडे पाहून हा हाडाचा सांगाडा प्रथमदर्शनी माझे वडील बाबामीयाँ सय्यद मोमीन यांचा असावा असा अंदाज व्यक्त केला . बाबामियाँ मोमीन हे गेले सहा महिन्यापासून बेपत्ता झाले होते.

त्यावेळी नातेवाईकांनी खूप शोध घेतला परंतु ते कुठेही आढळून न आल्याने त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात हरवल्या बाबतची तक्रार “मिसिंग” दाखल केली होती. दरम्यान या घटनेची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच वनविभागाने सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान उसात सापडलेला सांगाडा नेमका कोणाचा? बाबामिया सय्यद मोमीन यांचाच आहे ? किंवा कसे?हे तपासात निष्पन्न होऊ शकेल. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की, उसाच्या शेतात सापडलेला सांगाडा नेमका कोणाचा आहे? हे वैद्यकीय तपासणी झाल्यावर समजू शकेल. या बाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांना विचारणा केली असून घटनास्थळी वैद्यकीय टीम पाठविली आहे. त्यांचा अहवाल आल्यावर माहिती उपलब्ध होईल.दरम्यान घटनास्थळी स्थानिक नागरिक व बघ्यांची गर्दी झाली होती. उसाची तोडणी सुरु असलेला ऊस विघ्नहर सहकारी साखर कारखाना तोडीत असल्याने कारखान्याचे ॲग्री सुपरवायझर वसंत मोरे यांनीही घटनास्थळी जावून त्यांनी देखील याबाबतचा पंचनामा करून अहवाल कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी महेंद्र पाटील यांना पाठवला आहे. पिंपळगाव येथील गुलाब मोमीन म्हणाले की, उसाच्या शेतात सापडलेला सांगाडा हा बाबांमियाँ मोमीन यांचा असल्याचे कपड्यावरून दिसत आहे. बिबट्याचा हल्ला त्यांच्यावर झाला असावा असा आमचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *