लहान मुलांच्या रोगनिदान/संदर्भसेवा/शस्त्रक्रियेत शिरूरचे ग्रामीण रुग्णालय अग्रेसर..

लहान मुलांच्या रोगनिदान/संदर्भसेवा/शस्त्रक्रियेत शिरूरचे ग्रामीण रुग्णालय अग्रेसर
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १९/०१/२०२४.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शिरूर ग्रामीण रूग्णालयातर्फे तालुक्यातील सर्व शासकीय अंगणवाड्या व शाळांमधील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. ज्या बालकांना दृष्टीदोष, श्रवणाचे आजार, हृदयाचे आजार, जन्मजात दुभंगलेले ओठ, इतर आजार व अपंगत्व आढळतात त्यांना राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत योग्य त्या शस्त्रक्रियांसाठी संदर्भित करण्यात येत असते. तसेच लागणारी उपकरणे, श्रवणयंत्रे, अपंगांकरिता लागणारी उपकरणे मोफत पुरविली जातात.
त्याच पार्श्वभूमीवर दि. ११ जानेवारी २०२४ रोजी “टंग टाय शस्त्रक्रिया” (जीभ जन्मजात चिकटलेली असणे) शिबिर घेण्यात आले. या आजाराच्या प्रकारात मुलांची जीभ जन्मजात चिकटलेली असते व त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये बोबडेपणा येतो. त्यामुळे अपरिहार्यपणे त्यांच्या बोलण्याचा आत्मविश्वास कमी होऊन असे विद्यार्थी अभ्यास व इतर क्षेत्रांमध्ये मागे राहू शकतात. अशाप्रकारची ० ते १२ वयोगटातील मुले शालेय तपासणीत आढळून आल्यावर, त्यातील २० मुलांची शस्त्रक्रियेकरीता निवड करण्यात आली.
या शिबिरासाठी डॉ डोईफोडे, (कान, नाक, घसा तज्ञ तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे) व जिल्हा रुग्णालय औंध येथील तज्ञ सर्जनचे पथक पाचारण करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनील पोखरणा यांच्या देखरेखीखाली डॉ बत्ते, डॉ पाटील, डॉ सुहास मैड यांच्या सहकार्याने, हे शिबिर शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *