मंचरमध्ये ‘शरीर सुधारणा आणि मनःशाती अनुभूती’बाबत मार्गदर्शनपर शिबिर संपन्न..

आंबेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
‘सध्याच्या धकाधकीच्या काळात शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शरीर सुधारणा आणि त्यासोबत मनःशांतीसाठी सर्वांनीच विशेष प्रयत्न करण्याची गरज बनली आहे,’ असे मत शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी मंचर इथे व्यक्त केले. मंचरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शरद पवार सभागृहात रविवारी (दि. 7) संपन्न झालेल्या शिबिरात ते बोलत होते.

कोच प्रणिता गोडसे आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘शरीर सुधारणा आणि मनःशांती अनुभूती’बाबत मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन मंचरमध्ये करण्यात आले होते. यावेळी विवेक वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष शुभम खोमणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

“अलीकडे प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याबाबत विचार करताना दिसत आहे. कोरोना महामारीनंतर आरोग्याविषयी चांगलीच जनजागृती झाली आहे. पण ही जनजागृती आजारी पडल्यास वेळेवर उपचार घेणे, वेळेवर गोळ्या-औषधे घेणे किंवा व्यायाम करणे इथपर्यंतच मर्यादित असलेली दिसते. शरीर सुधारणा आणि मनःशांतीबाबत मात्र कुणीही विशेष मेहनत घेताना दिसत नाही. आपल्या शरीरात असलेला हाडाचा सांगाडा हा जितका निरोगी आणि मजबूत असेल तितके आपण आजारांपासून दूर राहू. तसेच शरीर सुधारणेचे मूळ देखील हाडांच्या आरोग्यातच असते. एकदा का शरीर सुधारणा होऊ लागली की मग, अध्यात्म आणि मेडिटेशन यांच्या योग्य प्रक्रियांतून आपण मनःशांती देखील मिळवू शकतो. परंतू हे सर्वकाही करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. कोच प्रणिता गोडसे टीमच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिबिरांमधून आपण हे मार्गदर्शन करत असतो. आजवर झालेल्या अनेक शिबिरातील शिबिरार्थींना याचा प्रत्यय आला आहे,” अशी माहिती ‘कोच प्रणिता गोडसे’ टीमच्या सर्वेसर्वा प्रणिता गोडसे यांनी दिली.

शरीर सुधारणा आणि मनःशांती या विषयाला घेऊन मंचर शहरात प्रथमच अशा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात श्रोता वर्ग उपस्थित होता. यावेळी कोच प्रणिता गोडसे यांच्या शिबिराचा अनुभव घेतलेल्या शिबिरार्थींनी आपले अनुभव कथन केल्याने सर्वांनाच ह्या विषयाचे महत्व लक्षात आहे. शिबिराचे सहआयोजक राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड. निलेश शेळके यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर विशाल कुंभार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *