मनपा प्रवेशद्वारावर कामगारांसाठी ठिय्या आंदोलन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तळवडे परिसरामध्ये ८ डिसेंबर रोजी झालेल्या स्फोट अपघातामध्ये १४ कष्टकरी महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये महानगरपालिका, कामगार आयुक्त विभाग, पोलीस प्रशासन, अग्निशमन विभाग या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुका मुळे कष्टकरी कामगारांचा मृत्यू झाला असून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच मृतांच्या वारसास प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात यावे. पिंपरी चिंचवड शहरातील कंपन्या कारखाने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे, कामगारांचे सोशल ऑडिट करावे या मागण्यासाठी मनपा गेटवर तीव्र आंदोलन करण्यात आले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे मार्गदर्शनात आंदोलन झाले .यावेळी जेष्ठ नेते मानव कांबळे ,राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंद्रन कुमार, महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार ,महिला अध्यक्ष माधुरीताई जलमुलवार, वृषाली पाटणे, अर्चना कांबळे,निमंत्रक किरण साडेकर,संतोष माळी, सलीम डांगे,समाधान जावळे, सलीम शेख,राजू पठाण,संभाजी वाघमारे,इंदुबाई वाकचौरे,नंदा तेलगोटे ,जरीता वाठोरे,सुनीता पोतदार, वहिदा शेख, मुमताज शेख, मनोज यादव, आशिष शेख ,सागर ठोंबरे, अमोल भंडारी
आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढलेले असून याला प्रशासकीय यंत्रणा दोषी असून ज्यांच्या ज्यांच्या चुकांमुळे असे मृत्यू झालेले आहेत त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मानव कांबळे म्हणाले की कामगारांच्या जीवाला कवडीमोल समजले जाते तळेगाव जनरल मोटरच्या कामगारांचा प्रश्नही शासनाने सोडवला नाही कामगारांची किंमत काय आहे हे पुढील कालावधीमध्ये सरकारला दाखवावे लागेल. चंदन कुमार म्हणाले की कंपन्यांचे सोशल ऑडिट होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जबाबदारी जबाबदारी स्वीकारून कामगार आणि कंपनीतली सुरक्षा याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आंदोलनानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्यावेळी त्यांनी इथून पुढे अशा प्रकारचे अपघात होणार नाही याची खबरदारी प्रशासन स्तरावरती योग्य रीतीने घेण्याचे काम सुरू असून महानगरपालिका जबाबदारीने सर्वेक्षण करत असून याचे परिणाम काही दिवसानंतर नक्कीच आपणास दिसतील असा विश्वास त्यांनी दिला. राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला