‘परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घेऊ’; चिंचवडच्या पोटनिवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी राखला ‘सस्पेन्स’ कायम

दि. १४/०१/२०२३
पिंपरी

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्यास ती निवडणूक राष्ट्रवादी लढवणार का ? या प्रश्नाला ‘परिस्थिती बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ’ असे उत्तर देऊन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या बाबतच्या प्रश्नावर सस्पेन्स कायम ठेवला.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर जगताप कुटुंबातील आमदार जगताप यांच्या पत्नी अथवा त्यांचे बंधू शंकर जगताप हे निवडणूक लढविणार अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी उमेदवार देणार का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींसह स्थानिक राजकीय नेत्यांना पडला आहे.

शनिवारी अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर आले असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना हा प्रश्न विचारला असताना पवार यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. सर्वसाधारणपणे अकाली निधन झालेल्या विधीमंडळ सदस्याच्या जागी त्याच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असेल तर त्याविरुद्ध उमेदवार न देण्याचा शिष्टाचार बहुतेक वेळा पाळला जातो. मात्र, सध्याचे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील ताणले गेलेले संबंध, तसेच महाआघाडीतील कुरबुरी यामुळे नेमके काय होईल हे सांगता येणार नाही. शिवाय महाआघाडीतील अन्य पक्षांची भूमिका त्यावेळी काय असेल हे देखील अंदाज बांधता येण्याजोगे नसल्याने अजित पवार यांनी असे उत्तर देऊन प्रश्नाला सोयीस्कर बगल दिली.

यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *