फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला; नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला होणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२


‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पापाठोपाठ ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला असून, त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

गुजरातमध्ये वडोदऱ्याला हा प्रकल्प होणार असून 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.हा प्रकल्प नागपूर येथे होईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्याचंही ते म्हणाले होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातला होणार आहे.

एअरबस आणि टाटा यांचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांनी हा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, हा प्रकल्पही गुजरातला गेल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *