बिबट्याच्या हल्ल्यात नारायणगाव येथे दोन जण जखमी

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यासह संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून नारायणगाव येथील नारायणवाडी परिसरात बिबट्याच्या हल्यात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना नारायणगाव येथील नारायणवाडी येथील भिल्ल वस्ती जवळ गुरुवारी दि. ३० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत येथील ग्रामस्थ विजय शेटे (वय ३५) यांच्या पायाला बिबट्याने चावा घेतला तर एक ४५ ते ५० वर्ष वयाच्या मेंढपाळाच्पा पायाला बिबट्याने नखांनी ओरखडले. व त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. या दोन्ही जखमींना येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे व सामाजिक कार्यकर्ते संजय वाजगे यांनी उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या दोन्हीही जखमींना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात लस देण्यात आली असून उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती वनपाल अनिता होले यांनी दिली. घटनास्थळी वनरक्षक पवार वनमजूर वन कर्मचारी खंडू भुजबळ तसेच पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी भेट दिली.


दरम्यान नारायणगाव येथील गुरुवर्य सबनीस विद्या मंदिरातील महिला वसतीगृहाजवळ बरोबर वर्षांपूर्वी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले असल्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालय विद्यार्थ्यांचे शिक्षक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहेत. आणखी दोन पिंजरे गव्हाळी मळा व मांजरवाडी येथे लावण्यात आले आहेत. कोल्हे मळा तसेच पिंपळगाव आर्वी येथे देखील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नवनिर्वाचित सरपंच शुभदा वावळ उपसरपंच योगेश पाटे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. या भागात बिबट्याची असलेली संख्या पाहता वनविभागाने तातडीने या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी विद्यार्थी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे याबाबत वनक्षेत्रपाल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *