राष्ट्रवादीच्या शिरूर शहर महिलाध्यक्षपदी श्रुतीका रंजन झांबरे : आमदार ॲड अशोक पवारांना धक्का

राष्ट्रवादीचे राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी जेव्हापासून भाजपच्या विद्यमान राज्यसरकारमध्ये पाऊल टाकले, तेव्हापासून दररोज एक एक धक्के राज्यातील राजकारणात बसत आहेत. लोकांना विश्वास बसणार नाही अशी नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना सोडून गेली होती. शरद पवारांच्या अनेक निकटवर्तीयांनी त्यांना सोडून राज्याच्या विद्यमान राज्यसरकारमध्ये सामील होणे पसंत केलेले होते. तेव्हापासूनच अनेक जणांचे वेगवेगळ्या पक्षात पक्ष प्रवेश सुरूच असून, अजित पवार गटाने राज्यातील तळागाळातील राजकारण ढवळून काढलेले दिसत आहे.


राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या आधीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी अजितदादांची साथ दिल्याने, प्रथम त्यांना अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षपद तातडीने देण्यात आले. त्यांनी लागलीच संपर्कातील काही तालुकाध्यक्षांच्या निवडी केल्या. त्यात शिरूर – हवेलीचे आधीच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे यांची अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष पदाची नियुक्ती देण्यात आली. त्यांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत ते स्वतः अजित पवार गटात गेल्याचे व त्या गटाचे तालुकाध्यक्षपद स्वीकारल्याचे घोषित करत, त्याच बैठकीत काही पदांच्या नेमणुकाही केल्या होत्या. तसेच बाहेर छुप्या मार्गाने त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिरूरच्या काही कार्यकर्त्यांना बघून, पत्रकार व उपस्थितांच्या भुवया उंचावलेल्या होत्या. तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्ते आपल्याला सोडून जात असल्याने, त्या काळात विद्यमान आमदार ॲड अशोक पवार यांना हा फार मोठा धक्का होता. आमदारांचे अनेक कट्टर समजले जाणारे कार्यकर्ते व पदाधिकारी रविबापू काळे यांच्या संपर्कात येतच राहीले आणि शिरूर हवेलीचे राजकारण नव्याने ढवळू लागले. शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी आमदार पवारांनी ज्यांना बसविले होते, त्या मोनिका हरगुडे यांना देखील अजित पवार गटाने महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यांच्या सोबत अनेक महिला, तरुणी व संपर्कातील कार्यकर्त्यांनी हरगुडे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते.
त्यातच नूतन तालुकाध्यक्ष काळे यांनी संधीचे सोने करण्यासाठी जे कार्यकर्ते दुर्लक्षित होते, अशांना पदे देत नूतन पदाधिकारी निवडीचा धडाका लावलेला आहे. याच आठवड्यात शिरूरला अजित पवार गटाची आढावा बैठक घेत अनेकांच्या नव्याने नियुक्त्या केल्यात. त्यात आमदार पवारांच्या अनेक जुन्या निष्ठावंतांनी अशोक बापूंना सोडत, नवीन नेतृत्व करणारे व त्यांचेच जुने तालुकाध्यक्ष रवी बापू यांचे नेतृत्व स्वीकारलेले दिसत आहे.


त्यामुळे आता शिरूर तालुक्यात एका बापू विरुद्ध दुसरे बापू तयार होऊ लागल्याचे दिसत असल्याने, पुढील राजकारणही आणखी ढवळून निघण्याची शक्यता आहे.
त्यातच रवी बापूंनी अशोक बापूंच्या अगदी जवळच्या समजल्या जाणाऱ्या शिरूर शहरातील झांबरे कुटुंबीयांना पद देत अशोक बापूंना घरचा आहेर दिलेला आहे. रंजन अशोक झांबरे यांनी शिरूर शहर युवकाध्यक्ष म्हणून सहा वर्ष व त्या आधी राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष म्हणून दोन वर्ष अशी तब्बल आठ वर्ष आमदरांसोबत काम केलेले होते. आमदारांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाताभाभी अशोक पवार यांचे अगदी निकटवर्तीय कुटुंब म्हणून झांबरे कुटुंब समजले जाते. त्याच कुटुंबात रवी बापूंनी श्रुतीका रंजन झांबरे यांना महिला शहर अध्यक्ष पदाची धुरा देऊन सुजाताभाभिंना धक्का दिल्याचे दिसते आहे. शिरूर तालुक्यातील या नवीन झालेल्या पदाधिकारी निवडींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या असून, अजून कोण कोण अजित पवार गटात प्रवेश करणार ? याकडेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
याआधीच तज्ञिका रुपेश कर्डिले यांची अजित पवार गटाच्या तालुका युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यादेखील आमदार अशोक पवार व सुजाताभाभी पवार यांच्या खूप निकटवर्तीय समजल्या जात होत्या. त्यांनीच तालुक्यातील युवतींना आता बरोबर घेण्याचा चंग बांधलेला दिसत असून, शिरूर शहर युवती अध्यक्षपदी पुनम मुत्याल यांची नेमणूक केलेली आहे.
शिरूर येथे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीवेळी, जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, जिल्हा युवकाध्यक्ष सचिन घोटगुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे, शहराध्यक्ष शरद कालेवार, महीला तालुकाध्यक्षा आरती भुजबळ, तसेच श्रीनिवास घाडगे, नारायण फडतरे, माजी सरपंच शिवाजी दरेकर, मार्केट कमिटी सदस्य संतोष मोरे, सरदवाडीचे माजी सरपंच विलास कर्डिले, दौलतनाना खेडकर, दादा लोखंडे, हरिदास कर्डिले, योगेश ढमढेरे, अशोक झांबरे, रंजन झांबरे, अमित गव्हाणे, माजी सरपंच बापू गव्हाणे व संजय कर्डिले, सोनू काळोखे, आशीर्वाद ढगे, तसेच शिरूर शहर व तालुक्यातील अनेक जुने – नवीन पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक तालुकाध्यक्ष अमोल वर्पे यांनी केले, तर आभार शरद कालेवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *