सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

कर्जत
दि.०२/०८/२०२३
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कर्जत येथेली एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते ५८ वर्षांचे होते.

नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन.डी. स्टुडिओ उभा केला होता. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांची कारकिर्द
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. यासारख्या अनेक चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. अनेक ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी उभारलेले सेट प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान, नितीन देसाई यांना त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.

आर्थिक विवंचनेचा सामना
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचं ही सांगितलं जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *