नारायणगाव महाविद्यालयात बँकिंग करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२० डिसेंबर २०२१

नारायणगाव


नारायणगाव ता. जुन्नर येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब नारायणगाव हायवे व रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्य नगर यांच्या सहकार्यातून बँकिंग क्षेत्रातील विविध तज्ञ मार्गदर्शकांनी यावेळी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र व बँकिंग विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेचा लाभ बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या वाणिज्य व कला शाखेतील अर्थशास्त्र आणि बँकिंग विषयाच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा.जी. बी. होले यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षा किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग विषयाच्या अभ्यासाचे महत्त्व विशद केले.आजच्या एकविसाव्या शतकात बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्राचे महत्त्व रोजगाराच्या दृष्टीकोनातून दिवसेंदिवस वाढत असून करिअरच्या अनेक संधी व पर्याय उपलब्ध असल्याचे रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष रो. डॉ. शिवाजी टाकळकर यांनी आपले मत व्यक्त केले.

बँकिंग क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन या विषयाच्या अनुषंगाने रो. रवींद्र पाटील,रो.विलास रवांदे,रो. संदीप दंडगवाळ यांनी विशेष मार्गदर्शन केले. भारतात बँक व्यवसाय क्षेत्र हे आर्थिक व्यवस्थेचा कणा असून करिअर करण्यासाठी उत्तम असे प्रगतिशील व प्रतिष्ठित क्षेत्र म्हणून बँकिंग क्षेत्राचा उल्लेख करता येईल, त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच बँकिंग क्षेत्राला अनुकूल असणारी विविध कौशल्ये व तंत्रज्ञान आत्मसात करावी असे मत रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरचे अध्यक्ष रो. रविंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त डेप्युटी महाव्यवस्थापक व आर्थिक सल्लागार रो. विलास रवांदे यांनी बँकिंग क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारी कौशल्ये या विषयावर सविस्तर विवेचन केले. तसेच एसबीआय जनरल इन्शुरन्सचे माजी जनरल मॅनेजर संदीप दंडगवाळ यांनी कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता वित्तीय व गुंतवणूक क्षेत्रात आपण सहज स्वयंरोजगार कसा उपलब्ध करू शकतो याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या कार्यशाळेचे आयोजन व नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी.बी. होले, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.शिवाजी टाकळकर, प्रा.आकाश कांबळे, डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी केले. यावेळी डॉ. राहुल गोंगे, डॉ शिरीष पिंगळे, प्रा.गजानन जगताप, प्रा.मयूर मोरे, डॉ. विनोद पाटे, डॉ. आबा जगदाळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले तर आभार प्रा.आकाश कांबळे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *