चिंचवड विधानसभा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळाले शिट्टी चिन्ह …

 

अतुल परदेशी
मुख्य संपादक
दि.10/02/2023

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली…
चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांचे नाव सर्वात पुढे होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चे नाना काटे व इतर दहा इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आणि आयात उमेदवार नको या मतावर ठाम राहिल्यामुळे आघाडीच्या नेत्यांची गोची झाली.महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे घोषित झाले.मात्र सर्वांचे लक्ष लागले ते राहुल कलाटे यांच्या भुमिकेकडे.
राहुल कलाटे यांनी 2019 ची विधानसभा निवडणुक बॅट चिन्हावर लढवत भाजप चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात तब्बल 1 लाख 12 हजार मते घेतली.2019 ची निवडणूक राहुल कलाटे हे अपक्ष जरी लढले असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने पुरस्कृत केले होते याच बरोबर इतर मित्र पक्षांनीही पाठिंबा दिला होता.त्यावेळी सर लढत ही भाजप चे आमदार लक्ष्मण जगताप व राहुल कलाटे यांच्यात झाली होती.2023 च्या या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असून भाजप चे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ह्या भाजप कडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार नाना काटे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवीत आहे तर राहुल कलाटे हे अपक्ष शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवित आहे.आज 10 फेब्रुवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर हे राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते त्यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी ही राहुल कलाटे यांचे उमेदवारी मागे घेण्याबाबत फोनवर बोलने झाले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी आमदार विलास लांडे माजी महापौर योगेश बहल नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्याही प्रयत्नाना अपयश आले आणि दुपारी 3:00 वाजल्या नंतर राहुल कलाटे यांनी कार्यकर्ते व हितचिंतक तसेच 2019 च्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 12 हजार मतदान करणा-या मतदारांच्या मताचा आदर करत ही निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.राहुल कलाटे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले असून चिंचवड विधानसभेच्या निवडणूकीत आता तिरंगी लढत होणार असल्याने जगताप आणि कलाटे यांच्या वाटेत ‘काटे’ की काटे मारतील बाजी या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *