महापालिकेच्या वतीने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन..

    महापालिकेच्या वतीने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन..

पिंपरी, दि. १४ फेब्रुवारी २०२४ :- महापालिकेच्या वतीने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रबोधन पर्वास नागरिकांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दर्शवावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

प्रबोधन पर्वानिमित्त भक्ती-शक्ती चौक निगडी, संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेजवळ चिंचवड, डांगे चौक थेरगांव तसेच एच.ए. कॉलनी पिंपरी या चार ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १४ ठिकाणी असलेल्या पुतळ्यांसही महापालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच महापालिका माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्ती-शक्ती उद्यान निगडी येथे गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. तसेच खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डाॅ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भक्ती-शक्ती उद्यान निगडी येथे सायंकाळी ६ वाजता मराठी चॅनेलवरील प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत पोवाड्यांचा कार्यक्रम तर रात्री ८ वाजता शिवशाहीर यशवंत गोसावी यांचे “असे होते छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत पोवाड्यांचा कार्यक्रम व रात्री ८ वाजता व्याख्याते बाजीराव महाराज बांगर यांचे “व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १७ ते १९ फेब्रुवारी रोजी सलग ३ दिवस सायंकाळी ७ शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान ग्रुप तळेगाव दाभाडे निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ४०० कलाकार, घोडे, उंट यांचा समावेश असलेले ३ मजली सेटवरील ‘’शिवसह्याद्री’’ हे भव्य महानाट्य सादर होणार आहे. तसेच १७ ते १९ फेब्रुवारी रोजी सलग तीन दिवस दिवसभर प्रद्योत पेंढारकर यांचे ५०० हून अधिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. सदर महानाट्य व शस्त्रास्त्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून ते विनामुल्य आहे.

संभाजीनगर, कमलनयन बजाज शाळेशेजारी, चिंचवड येथे शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते प्रविणदादा गायकवाड यांचे “छत्रपती शिवाजी महाराज व आजची पिढी” या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहे तर शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता लोकमतचे राज्य संपादक संजय आवटे यांचे ‘’असे होते छत्रपती शिवाजी महाराज’’ विषयावरील व्याख्यान आणि रविवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अभिनेत्याचा अभिनय अर्थात मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेत सिनेकलाकार प्रा. महादेव वाघमारे यांचा मिमिक्रीचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते तात्यासाहेब मोरे यांचे “प्रेरणा शिवचरित्राची” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डांगे चौक, थेरगांव येथे शनिवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांचा शाहिरीचा कार्यक्रम तर रविवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अझिज काझी आणि ओंकार वर्पे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते राजेंद्र कांबळे कडूसकर यांचे “आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान होणार आहे.

तर एच. ए कॉलनी, पिंपरी या ठिकाणी रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांस शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *