आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना महापालिका सभेने कोरोना संकटकाळात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ९ मे २०२१
कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांबाबत माहिती तसेच आढावा घेण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिका-यांसमवेत बैठक घेतली. महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीवेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉय आदी उपस्थित होते.

        सध्या कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. अशा कालावधीत अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. विशेषत: आर्थिकद्रष्टया दुर्बल घटकातील नागरीकांना याची झळ बसली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीन हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून संबंधितांच्या खात्यावर ही रक्कम अदा करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली. नदी पात्रातील जलपर्णीमुळे परिसरातील नागरिकांना विविध त्रासातून जावे लागत असून डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. त्यामुळे जलपर्णी काढून टाकण्याचे काम जलदगतीने वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश देखील यावेळी त्यांनी दिले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव, आकुर्डी रुग्णालयांसह सर्व रुग्णालये सुसज्य ठेवा तसेच आवश्यकता पडल्यास महापालिकेच्या रिक्त इमारती अथवा शाळांमध्ये रुग्णालयांची उभारणी करावी. यासाठी नव्याने शहरात जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याची गरज नसून यावर होणारा अनावश्यक खर्च टाळावा. भविष्यातील ऑक्सीजनची गरज लक्षात घेता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लाँटची उभारणी करा. मृत्यू दर नियंत्रीत ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत करा. अॅम्बुलन्सच्या दरांवर देखील नियंत्रण ठेवा. एचआरसीटी, सीटीस्कॅनची गरज सध्या रुग्णांना भासत आहे, त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी याबाबत शासनाप्रमाणे वाजवी दर आकारणीबाबत महापालिका प्रशासनाने ‍नियंत्रण ठेवावे, अशा सुचना आमदार जगताप यांनी यावेळी दिल्या.

शहरातील लसीकरणाचा आढावा घेवून शासनाकडून उपलब्ध होणा-या लसींचे योग्य नियोजन करून यामध्ये औद्योगिक नगरीतील कंपन्यामध्ये काम करीत असलेल्या कामगारांच्या लसीकरणाला देखील प्राधान्य द्यावे, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर सोसायटया तसेच वस्तीपातळीवर देखील लसीकरण केंद्र सूरू करावे, असे आमदार जगताप यावेळी म्हणाले.

        कोरोनाची लक्षणे असणा-या रुग्णांनी घरीच न थांबता स्वत: चे तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करून घ्यावे. जेणेकरून या आजाराचे संक्रमण होवून इतर व्यक्ती बाधित होणार नाही. शिवाय संबंधित रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य उपचार होवून आवश्यकता पडल्यास पुढील तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता येईल. महापालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये बेड उपलब्ध असून याबाबत माहिती घेण्यासाठी मी जबाबदार या ऍपचा वापर करावा, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेवून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *