रयतच्या मलठण शाखेत गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

दि. १२/०१/२०२३

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चार विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याचे व ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरणारी ही चौथ्या क्रमांकाची शाखा असल्याचे मुख्याध्यापक जयवंत झेंडे यांनी सांगितले.

बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद नरवडे यांच्या पुढाकारातून झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी, रा. प. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व बेट भागाचे राष्ट्रवादीचे युवा नेते राजेंद्र पोपटराव गावडे होते.


यावेळी इ ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या कु. पुर्वा रवींद्र खुडे, साहिल बाबा दाते, तसेच इ ५ वी चा सार्थक मल्हारी डांगे व सार्थक सतीश मावळे या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व पेन भेट देवून सन्मानित करण्यात आले. तर इ. ५ वी वर्गाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख लता गायकवाड, मार्गदर्शक सचिन कोकरे, भारती चांदणे-खुडे व सत्यश्री थोरात, त्याचप्रमाणे इ. ८ वी वर्गाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख धनश्री ताठे, मार्गदर्शक सुनंदा चौधरी व सुरेश तिटकारे यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राजेंद्र गावडे म्हणाले की, “यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक तर आहेच परंतु ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने प्रयत्न करायला हवेत.” त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, “माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना वैमानिक व्हायचे होते, परंतु उंची कमी भरल्याने त्यांना बाद करण्यात आले. तेव्हा ते खूप रडले व आपल्या गुरूंकडे गेले. गुरूंनी त्यांना सल्ला दिला की खचून जाऊ नकोस, कदाचित नियतीला तुझ्याकडून याहीपेक्षा खूप मोठी अपेक्षा असेल. आणि या एकाच सल्याने त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि जिद्दीने ते शास्त्रज्ञ बनून, त्यांना जे विमान चालविता आले नाही त्याही पलीकडे जाऊन त्यांनी विमानापेक्षाही अधिक धावणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती केेली.”

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद नरवडे, स्कूल कमिटी सदस्य विलास थोरात, सा कार्यकर्ते संदीप गायकवाड, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने रवींद्र खुडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब वाव्हळ, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र गायकवाड व दादासाहेब गावडे, पर्यवेक्षक मारुती रासकर, ज्येष्ठ शिक्षिका छाया भोगवडे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत झेंडे यांनी केले तर सुत्रसंचालन सुरेश तिटकारे व आभार सत्यश्री थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *