पवना धरणाच्या पाण्यात पोहोताना बुडून निवृत्त शिक्षकाचा मृत्यू

दि. ०९/०१/२०२३

लोणावळा


लोणावळा : मावळ तालुक्यातील दुधिवरे गाव परिसरात कुटुंबासह पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील एका निवृत्त शिक्षकाचा पवना धरणात पोहताना दमछाक होऊन मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी घडली.

प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय ६२, रा. नेहरुनगर, कुर्ला, मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकाश भाटिया हे पवना धरण परिसरातील दुधिवरे गाव परिसरात कुटुंबासह पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास भाटिया हे पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. पोहता येत असल्याने ते खोल अंतरापर्यंत पाण्यात पोहत गेले. मात्र पोहताना त्यांना मोठ्या प्रमाणावर दमछाक होऊ लागली. त्यामुळे ते पाण्यात बुडाले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवदुर्ग संस्थेच्या पथकाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. काही वेळच्या प्रयत्नानंतर त्यांनी भाटिया यांना पाण्याच्या बाहेर काढत रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *