वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे पुणे जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं – सुप्रिया सुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ सप्टेंबर २०२२


एकनाथ शिंदे-फडणवीस स्वार्थी, स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी दीड-दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं. स्वतःला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायचे आणि या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचं पाप एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठं काही तरी आपण आणू मात्र मी त्यांना म्हणते की तुम्ही राजीनामा द्या आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करा आम्ही तुम्हाला मोठं काही तरी देऊ, असं बोलण्याला काही अर्थ आहे का? अशी टीका वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्टबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे पुणे जिल्हा व राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दीड लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. महाराष्ट्राच्या तरुणांचा तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप राज्य सरकारने केलं आहे. काही हिताचं आणि चांगलं काम केलं तर यांनी केलं आणि वाईट केलं तर मविआ सरकारने केलं, अशी यांची कायम भूमीका असते, असाही हल्लाबोल त्यांनी केला. आम्ही हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटावं.आम्हीही यासाठी मदत करु, असंही त्या म्हणाल्या. जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामं रखडली आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना स्थानिक कामं करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे. डीपीडिसी 800 कोटी थांबवले आहेत. लोकांच्या हक्काचे पैसे का थांबवले आहेत? हे पाप मी कधीच केलं नसत. सर्व सामान्याच्या हिताची कामे रखडली आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नियुक्ती तातडीने करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *