मुंबई तोडण्याची भाजपची भाषा कर्नाटकच्या मंत्र्याने जगासमोर आणली – उद्धव ठाकरे

२९ डिसेंबर २०२२

नागपूर


मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची भाषा भाजपने आधीपासून केली आहे. कर्नाटकचे भाजप मंत्र्यानेच हा डाव जगासमोर उघड केला. त्यांच्या एका वक्तव्यातून भाजपच्या पोटातलं ओठावर आलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यलयावर ताबा घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला तोच प्रयत्न आजच्या आरएसएस कार्यालयाच्या भेटीत झाला असेल, अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज नागपुरात आरएसएस कार्यालयाला भेट दिली. कर्नाटकचे भाजपचे मंत्री सी एन अश्वत्थ नारायण यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. दीड महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जशी निवडणूक जवळ येईल तसे शिवसेनेकडून पुन्हा मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार सुरु होईल. आता भाजपाच्या पोटातलं भाजपच्याच (कर्नाटकाच्या) मंत्र्यांच्या ओठावर आलं. मुंबई तोडण्याचा आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव भारतीय जनता पक्षातल्या पोटात आहे. तो त्यांच्याच मंत्र्याने जगासमोर आणला. आज मुख्यमंत्री बोम्मई ज्या हिमतीने आणि धाडसाने बोलत आहेत, त्या तुलनेत आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाहीत किंवा काही काम करत नाहीत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला

२००८ साली सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, सीमाभागातील परिस्थिती जैसे थे ठेवा. पण २००८ पासून २०२२ पर्यंत कर्नाटक सरकारने सीमाभागात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांनी तिथे विधानभवन बांधले, उपराजधानी केली. बेळगावचे नामांतर केले. मराठी भाषिकांवर भाषिक अत्याचार केले, त्याला आपण काहीच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली पाहीजे. २००८ पासून २०२२ पर्यंत काय काय बदल झाले, हे मांडले पाहीजे. जेणेकरुन सीमाभाग महाराष्ट्राचा होईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *