अपहृत बालकाचा २३ तासात शोध; पोलिसांची चमकदार कामगिरी

दि. २९/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : उदरनिर्वाहासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उदारनिर्वाहासाठी पेन, टिश्यू पेपरची विक्री करणाऱ्या एका दाम्पत्याच्या सव्वादोन वर्षाच्या मुलाचे २७ डिसेंबर रोजी अपहरण झाले होते. पिंपरी पोलीस ठाणे तपास पथक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा युनिट-२ चे कर्मचारी यांनी या प्रकरणी तातडीने तपास करून अवघ्या २३ तासात अपहृत बालकाचा शोध लावला.

बार्शी, सोलापूर येथील रवि सुनील पवार व राधा पवार हे दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी शिवाजीनगर, पुणे येथे स्थायिक झाले आहे. ते ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पेन, टिश्यू पेपर विकतात. त्यांची ३ मुले त्यांच्याबरोबर असतात २७ डिसेंबर रोजी दुपारी पवार त्यांच्या मुलांना भूक लागल्याने त्यांना चौकातील कुंड्यांजवळ बसवून पवार त्यांच्यासाठी वडापाव आणण्यास गेले. त्याची पत्नी वस्तू विक्री करीत होती. पवार परतले असता त्यांना सव्वादोन वर्षांचा मुलगा रोहित तेथे नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनीही पत्नीला विचारले असता ती देखिल याबद्दल अनभिज्ञ होती. त्यामुळे त्यांनी पिंपरी पोलिसठाण्यात धाव घेतली. तेथील पोलीस निरीक्षक औताड़े यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाणे तपास पथक, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा युनिट-२ येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांची स्वतंत्र पथके बनवून तपासासाठी रवाना केली.
प्राथमिक तपासामध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेऊन गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनीही त्या महिलेचा माग काढण्यासाठी पिंपरी रेल्वे स्टेशन, पिंपरीगाव, चिंचवड रेल्वे स्टेशन, तळेगाव, देहुरोड, कामशेत, लोणावळा, कल्याण,येथील सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

तपासणीमध्ये आरोपी महिला अपह्त बालकासह शिरगाव परिसरात गेली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान साईबाबा मंदिर शिरगाव येथे एक मुलगा बेवारस असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच पोलिसांनी तेथे जुना पाहणी केली असता महिला आरोपी अपहृत बालकाला सोडून निघून गेल्याचे आढळले. पिंपरी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सावर्डे आणि सुर्यवंशी यांनी जाऊन शहानिशा केली.त्यानंतर त्या बालकाचा ताबा त्याच्या आई वडिलांकडे देण्यात आला. अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २३ तासांत अपह्त मुलाचा शोध घेण्यात यश मिळाले. आरोपी महिलेचा शोध सुरु असून गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक डोंब करीत आहेत.

ही कामगिरी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औताडे, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, गुन्हे शाखा युनिट- २ तसेच शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *