२९ डिसेंबर २०२२
पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत भाषण दिले. त्यावेळी त्यांनी राजकारणासह अनेक विषयांवर भाष्य केले. ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले, ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केलं त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे. ती पाहिली की वाईट वाटतं. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता, मी थोबाडाला आवर घालून बोलावं अशी इच्छा असावी असं राज ठाकरे म्हणाले. कारण मला व्याख्यान आणि भाषण यातला काही फरक कळत नाही. बाकी राज्यात राजकारण कसं चाललं तुम्ही रोज बघताच आहात. काय काय चाललंय? बोलण्याची पद्धत कशी आहे. प्रवक्तेही कसं बोलतात तुम्ही पाहात आहात. ऐकूच नये, पाहूच नये अशा गोष्टी सुरू आहेत. अनेक टेलिव्हिजन चॅनल्सचा वाटा असतो. त्यामुळे ते तुला काय वाटतं, तुला काय वाटतं? हे सुरू राहतं आणि मूळ विषय बाजूला राहतात. मी माझ्या बोलण्यात शिव्या देऊ नये म्हणून व्याख्यान असं नाव दिलं गेलं असेल.
आत्ताची महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की राजकारण नासवलं जातं आहे. इथे लोक मोठे झाले, उद्योजक झाले. हे सगळं जाणीवपूर्वक नासवलं जातं आहे. महाराष्ट्रातले लोक शांत बसले आहेत.आम्हाला राजकारणात यावंसं वाटत नाही. विधानसभेत होणाऱ्या चर्चा तर मलाही ऐकवत नाही. बाहेर आल्यानंतर जे काही बडबड करतात ती तर अजिबात ऐकवत नाही. मग मला प्रश्न पडतो की आपला महाराष्ट्रातला मराठी का गप्प बसला आहे? तो या सगळ्या गोष्टींच्या विरोधात सारासार विचार करून बोलत का नाही? असाही प्रश्न राज ठाकरेंनी आपल्या व्याख्यानात विचारला.