शिरूर येथील वनकर्मचारी ACB च्या जाळ्यात : तब्बल 1 लाखांची लाच घेताना अटक

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१९ नोव्हेंबर २०२१

शिरूर


शिरूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल व वनरक्षकाला एक लाख रुपयांची लाच घेताना, पुणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलेय. विशेष म्हणजे तालुक्याच्या वनविभागाच्या कार्यालय आवारातच ही लाच घेताना, दोघांना अटक झालीय. सविस्तर माहिती अशी आहे की, काही दिवसांपूर्वी लाकडाने भरलेल्या दोन माल वाहतूक गाड्या, या कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या होत्या. त्या गाड्यांवर कारवाई करू नये व त्या गाड्या सोडून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आलेली होती. परंतु सदर गाडीमालकांनी पैसे न देता, पुणे ACB कडे या बाबत तक्रार दाखल केलेली होती. त्याप्रमाणे लाचलुचपत विभागाने दि. 10 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली असता त्यांना यात तथ्य दिसून आल्याने, गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सापळा रचण्यात आला आणि त्यात शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील दोन कर्मचारी, एक लाखांची रोकड घेताना पुणे ACB च्या जाळ्यात अलगद अडकले.

शिरूर येथील वनकर्मचारी ACB च्या जाळ्यात

या कारवाईत वनपाल सागर नवनाथ भोसले व वनरक्षक संजय जयसिंग पावणे, या दोन कर्मचाऱ्यांना अटक झाली असून, पुणे लाचलुचपत विभागाच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील कार्यवाहीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील सागर भोसले यांची दौंड येथे कार्यरत असताना, त्यांच्या अनेक तक्रारी असल्याच्या आता समोर येत आहे. त्यांच्या सेवेतील कारकीर्द वादग्रस्त असल्याचेही पुढे येत आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली, उप अधीक्षक श्रीहरी पाटील व त्यांच्या पथकाने केलीय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *