देहू नगरपंचायतीच्या बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

पिंपरी : देहू नगरपंचायतीची विशेष सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण होत्या. या सभेला गटनेते योगेश परंडवाल, बांधकाम सभापती योगेश काळोखे, नगरसेवक प्रवीण काळोखे, मयूर शिवशरण, नगरसेविका पूजा काळोखे, पूजा दिवटे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव उपस्थित होते.

रमाई घरकुल योजनेतील घरकुले लाभार्थींना शासनाच्या अटी, शर्तीनुसार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून दिव्यांगांना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच भीमाशंकर सोसायटी कडे जाणारा रस्ता, गाथा मंदिर शिवनगरीतून गंधर्व विहारकडे जाणारा रस्ता आणि चव्हाण नगर भाग 2 मधील मयूर घनवट ते आनंद चव्हाण यांच्या घरापर्यंतचा रस्ता यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेचा मोबदला अदा करण्यासाठी समिती स्थापना करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. इंद्रायणी नदीवरील पुलांना लोखंडी जाळ्या बसविणे, स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेसाठी सल्लागाराची नियुक्ती करणे, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यावर बैठकीत चर्चा झाली. देहूगाव आणि निघोजे यांना जोडण्यासाठी इंद्रायणीवर पूल उभारण्याच्या विषयाला गती देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *