अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; ५० खोके, एकदम ओक्केच्या घोषणा

१९ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात होतेय. महाराष्ट्र एकीकरण समिती, विदर्भाला न्याय, धानाला भाव मिळाला पाहिजे, महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी मविआ व घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. आजच्या या आंदोलनात अजित पवार, अंबादास दानवे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे आदी उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वात यंदा पहिलेच हिवाळी अधिवेशन होत आहे. यापूर्वीच्या पावसाळी अधिवेशनातदेखील विरोधकांनी ५० खोकेच्या घोषणांनी मुंबईतील विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. आजच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवातही विरोधकांच्या जोरदार घोषणांनी झाली.

पन्नास खोके एकदम ओके, फडणवीस सरकार हाय हाय, कर्नाटक सरकार हाय हाय, ईडी सरकार हाय हाय अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. बोम्मईसमोर झुकलेल्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा तसेच मूग गिळून हा अन्याय सहन करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणून गेला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *