संजय राऊत, चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल – चंद्रशेखर बावनकुळे

०८ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांनी आव्हान देऊ नये, राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालयातच तोडगा निघेल. न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी करून या प्रकरणी निर्णय द्यावा यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे आपले आवाहन आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातच तोडगा निघेल हे माहिती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वतः सीमाभागात जाणार असल्याचे जाहीर करणे शोभत नाही. त्यांना सीमाभागात जायचे होते तर ते आधी का गेले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. जी २० संबंधी बैठकीस निमंत्रण असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा अधिक महत्त्व स्वतःच्या राजकारणाला दिले व महाराष्ट्राचा अपमान केला, असेही त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *