माझं वक्तव्य चुकीचं नाहीच, मतदारांना धमकी दिल्याच्या वक्तव्यावर नितेश राणे ठाम

१४ डिसेंबर २०२२


नांदगावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेतील वादग्रस्त वक्तव्यावर आमदार नितेश राणे अजूनही ठाम आहेत. मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझ्या मतदार संघावर माझा हक्क आहे. त्याच अधिकारातून मी आवाहन केलंय, असे म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. तेव्हा माझ्या विचाराचा सरपंच निवडून दिला नाहीत तर गावाला एका रुपयाचा विकास निधी देणार नाही, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावरून राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत होती तसेच मतदारांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता.

आपल्या मुद्द्याचं समर्थन करताना नितेश राणे म्हणाले, ‘ मी त्या वक्तव्यात मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून माझा बोलण्याचा अधिकार आहे. माझ्या आणि माझ्या मतदारांमध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्या मतदारांना त्यात काहीही चुकीचं वाटलं नाही.गल्लीपासून दिल्लीतपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे, त्या पक्षाला मतदान केलं नाही तर विकास कसा होणार? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं.

खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधीपक्षात आहेत. ते कोणतीही केंद्र सरकारची योजना,निधी आणू शकत नाही. आमदार वैभव नाईक एक रुपयांचा निधी तरी आपल्या मतदारसंघात आणू शकले का? निधी देणारे सर्व मंत्री जर भाजप पक्षाचे असतील तर मी काय चुकीचे बोललो? पनवेल ते सिंधुदुर्गपर्यंत मी भाजपचा एकमेव आमदार आहे. मग मी माझ्या पक्षाचा लाडका नाही का? माझे नेते माझं ऐकणार नाही का? या सर्वांची जाणीव मी माझ्या मतदारांना करून दिली असेन तर त्यात काही चुकीचं नाही, असं स्पष्टीकरण नितेश राणेंनी दिलंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *