समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विश्वकर्मा योजना : सुनील देवधर…

 

विश्वकर्मा फौंडेशन पुणे आयोजित राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा संपन्न

पुणे (दि.३ जानेवारी २०२४) जगाची निर्मिती प्रभू विश्वकर्मांनी केली आहे. या नावाने ओळखले जाणाऱ्या विश्वकर्मा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ पासून विश्वकर्मा योजना लागू केली आहे. याचा समाजातील युवकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन माय होम इंडिया या संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी केले.
विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुनील देवधर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक अंबादास सुतार, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, संस्थेचे मुख्य विश्वस्त विवेकानंद सुतार, संगीता सुतार, अध्यक्ष राजाराम दिवेकर, उपाध्यक्ष पांडुरंग सुतार, महिला अध्यक्ष अमृता देगावकर आदी उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा फौंडेशनच्या ची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
सुनील देवधर यांनी सांगितले की, अहंकारी व्यक्तीचे पतन होते. नम्रतेने ध्येय गाठता येते, अंबादास सुतार यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी नम्रतेने आपले ध्येय गाठले आहे. असे निश्चित ध्येय गाठण्यासाठी व आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा वापर करून विकास साध्य करण्यासाठी विश्वकर्मा योजनेचा गरजू बेरोजगार युवकांनी लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी. या योजनेमध्ये पंधरा दिवसाचे प्रशिक्षण, प्रत्येक प्रशिक्षणार्थीला ७५०० रुपये शिष्यवृत्ती आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अनुदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्याचे जाहीर केले आहे.
सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, ताम्रकार पांचाळ या समाजातील व्यक्ती विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात. देशाचा विकास होण्यामध्ये यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. विश्वकर्मा फौंडेशनचे कार्य स्तुत्य असून या कार्यास सर्वांनी हातभार लावावा असेही देवधर म्हणाले.
प्रमुख पाहुणे उद्योजक अंबादास सुतार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वकर्मा समाज बांधव एकमेकांना संघटित करीत आहेत. हे अभिमानास्पद आहे या समाज बांधवांच्या अंगी असणारे कलागुण याचा वापर करून उद्योग व्यवसायात पुढे येता येते अशी अनेक उदाहरणे आहेत. विश्वकर्मा फौंडेशन या संस्थेची मागील ९ वर्षाची वाटचाल ही सर्व समावेशक आणि कौतुकास्पद आहे. विश्वकर्मा समाज आणि इतर न्याती बांधवांना देखील बरोबर घेऊन वधू वर परिचय मेळावे, विद्यार्थी गुणगौरव समाजभूषण पुरस्कार असे उपक्रम आयोजित करीत आहेत. आत्ताच्या आधुनिक युगात केवळ एका समाजाचा विचार करून विकासाचे ध्येय साध्य करता येणार नाही, तर इतर बांधवांनाही बरोबर घेऊन पुढे जावे लागेल तरच समाजाचा आणि देशाचा विकास होईल. समाजाच्या संघटनेची व्याप्ती आता देशभर होण्याची गरज आहे.
संस्थेचे मुख्य विश्वस्त विवेकानंद सुतार यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या संस्थेच्या वतीने २४×७ ऑनलाईन पद्धतीने कार्यरत असणारी वधू वर नोंदणी वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. विश्वकर्मा फौंडेशन दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, शिष्यवृत्ती, वधु वर परिचय मेळावा, सामाजिक समस्या निराकरण वंचित निराधार वृद्ध व्यक्तींसाठी सहाय्य असे उपक्रम राबविण्यात येतात.
आयोजनात सुनील शिरसाठ, सुनील दिक्षित, विष्णूकांत पोतदार, ओंकार सुतार, किरण खरकड, नरेंद्र बोरसे, शेखर खिलारे, करण डूकले, राजू सूंभे, सोमनाथ गायकवाड, नीळकंठ सुतार, गणेश सुतार, अमेय सुतार, प्रदीप गाडे, विठ्ठल पांचाळ, सौ. सुरेखा सुतार, सौ.स्वाती पोतदार, ॲड.कोमल सुतार यांनी सहभाग घेतला.
स्वागत राजाराम दिवेकर, प्रास्ताविक विवेकानंद सुतार, सूत्र संचालन कुमार कोद्रे केले. आभार पांडुरंग सुतार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *