लोकशाहीच्या गप्पा मारणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते – देवेंद्र फडणवीस

३१ डिसेंबर २०२२

नागपूर


उठसूठ लोकशाहीच्या गप्पा मारणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

रोज जे लोक लोकशाहीची दुवाही देत होते. राज्यात लोकशाहीविरोधी सरकार आहे, असा आरोप करतात. तेच लोकं संपूर्ण अधिवेशनात सभागृहात केवळ ४६ मिनीटं होते. त्यामुळे लोकशाहीवर त्यांचे किती प्रेम आहे. हे यावरून लक्षात येईल. आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहोत. त्यामुळे या सभागृहाच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केलं आहे. अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.

शिवसेना (ठाकरे गट) एका ३२ वर्षीय युवकाला सरकार घाबरले, अशी टीका करते याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, त्यांच्या पूज्य पिताश्री यांना आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो. तर त्यांना काय घाबरणार.

तसेच दोन आठवडे चाललेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. अधिवेशनादरम्यान एकूण ८४ तास १० मिनिटे काम झाले. विविध कारणांमुळे ८ तास ३१ मिनिटे वाया गेली. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात १२ मंजूर विधेयके मंजूर करण्यात आली. विधान परिषदेत तीन विधेयके प्रलंबित आहेत. ३६ तारांकित प्रश्नांवर उत्तर देण्यात आले. एकूण ४२२ प्रश्न स्वीकृत झाले होते. यावेळी १०६ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती ७९.८३ टक्के होती, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *